मेडिकल : संक्रमण आजार नियंत्रण विभागाचे होणार विस्तारीकरण!नागपूर : उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप घराघरात दिसून येत आहे. एकट्या मेडिकलमध्ये आतापर्यंत ३०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. दरवर्षी या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याला लक्षात घेऊन मेडिकल प्रशासन येत्या एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या ‘संक्रमण आजार नियंत्रण विभागा’त डेंग्यू रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या विचारात आहे. संक्रमण आजार व त्यावर नियंत्रण आणि उपचाराची जबाबदारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. परंतु, मागील ५० वर्षांपासून मनपाने पुढाकारच घेतला नाही. केवळ जनजागृती करणाऱ्या एजंसीच्या रूपाने मनपाची भूमिका राहिली आहे. रुग्णांवर तत्काळ व योग्य पद्धतीचा उपचार मिळावा यासाठी विशेषत: स्वाईन फ्लू रुग्णांसाठी संक्रमण आजार नियंत्रण विभागाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. २०१० मध्ये हा प्रस्ताव जिल्हा विकास नियोजन समितीला पाठविण्यात आला होता. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांच्या कार्यकाळात सहा कोटींचा टीबी वॉर्ड परिसरात तीन मजली विभाग तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. पण, वर्षभरातच जिल्हा नियोजन समितीने निधी कमी केला. ६ कोटींऐवजी १ कोटी ९१ लाख देण्यास मंजुरी दिली. जागेला घेऊनही बराच वाद झाला. तब्बल तीन वर्षानंतर ओटीपीटी इमारतीच्या बाजूची जागा अखेर निवडण्यात आली. परंतु या जागेवरील ७६ झाडे अडचणीची ठरली. मंजुरी मिळण्यास वर्ष लागले. झाडे तोडल्यानंतर माती परीक्षणात दोष आढळून आले. यामुळे इमारतीच्या फाऊंडेशनमध्ये बदल करण्यात आला. स्ट्रीक पुटिंग पद्धतीद्वारे फाऊंडेशन करण्याचे ठरले. सात महिन्यांपूर्वी ९०० स्क्वेअर मिटर जागेवर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. खोदकाम सुरू असताना मोठी ड्रेनेज लाईन गेल्याचे दिसून आले. यामुळे महिनाभर या विभागाचे बांधकाम काम रखडले होते. आता ते पुन्हा सुरू झाले. येत्या मार्च महिन्यापर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या इमारतीमध्येच डेंग्यू रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या विचारात मेडिकल प्रशासन आहे. यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यू रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड !
By admin | Published: October 26, 2014 12:19 AM