नीलम गोऱ्हे यांचा उपसभापती होण्याचा मार्ग मोकळा; सोमवारी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 02:29 AM2019-06-22T02:29:32+5:302019-06-22T06:39:49+5:30

विजय वडेट्टीवारांचेही नाव विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर होण्याची शक्यता

Free the way to Neelam Gorhe's deputy | नीलम गोऱ्हे यांचा उपसभापती होण्याचा मार्ग मोकळा; सोमवारी निवड

नीलम गोऱ्हे यांचा उपसभापती होण्याचा मार्ग मोकळा; सोमवारी निवड

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या आ. नीलम गोºहे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून सोमवारी त्यांची निवड होईल. काँग्रेसने यासाठी आग्रह धरला होता. मात्र भाजपने विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद हवे असेल तर उपसभापतीपदाचा निर्णय घ्या, असे सांगत काँग्रेसची गोची केली होती.

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची मुदत १७ जुलै २०१८ ला संपली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. यावर काँग्रेस हक्क सांगत होती. शरद रणपिसे, अमर राजूरकर आणि भाई जगताप हे नेते त्यासाठी उत्सुक होते. आपल्याकडे संख्याबळ आहे असे म्हणत काँग्रेसने आग्रह कायम ठेवला होता. मात्र राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसचे गटनेते झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करा, असे पत्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले. त्याचवेळी भाजप शिवसेनेने उपसभापतीपद आम्हाला द्या, नाहीतर वडेट्टीवार यांना हे पद देणार नाही, असे सांगितले. आ. गोऱ्हे उपसभापती झाल्या की वडेट्टीवार यांचेही नाव विरोधी पक्ष नेता म्हणून जाहीर केले जाईल.

दिल्लीपर्यंत हा विषय काँग्रेसने नेला. शेवटी गुरुवारी रात्री या पदासाठी आपण लढायचे नाही, असा निर्णय घेतला गेला. त्यामुळे सोमवारी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे या पदासाठीची निवडणूक जाहीर करतील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारपर्यंत वेळ दिला जाईल व एकच नाव आल्यास दुपारी नाव जाहीर केले जाईल. शिवसेनेने आ. नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित केले आहे. शिवसेनेतून काही नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळेही या सगळ्या निवडीला विलंब होत होता.

परिचारक यांचे निलंबन रद्द, शिवसेना गप्प
विधानपरिषदेचे संख्याबळ ७८ आहे. त्यात दोन्ही बाजूची संख्या आज ३९ एवढी आहे. त्यामुळे जर मतदान झाले तर ‘कांटे की टक्कर’ होईल म्हणून उपसभापतीपदासाठी अडचण होऊ नये म्हणून शिवसेनेने आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा लावून धरलेला मुद्दा अखेर सोडून दिला व त्यांचे निलंबन मागे घेतले गेले.
सैनिकांच्या पत्नीविषयी अपशब्द वापरणाऱ्या परिचारक यांच्याबद्दल सेनेने घेतलेली कठोर भूमिका एका उपसभापतीपदासाठी सोडून दिली त्यामुळे यांचे सैनिकांविषयी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट झाले, अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

विधान परिषदेचे संख्याबळ
राष्ट्रवादी काँग्रेस १७
काँग्रेस १६
भाजपा २३
शिवसेना १२
लोकभारती १
शेकाप १
पिपल्स रिपब्लिकन पार्टी १
राष्ट्रीय समाज पक्ष १
अपक्ष ६
एकूण ७८

Web Title: Free the way to Neelam Gorhe's deputy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.