मुंबई : शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी असल्याने अर्धवेळ ग्रंथपालांच्या थांबवण्यात आलेल्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रश्नी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांची भेट घेतली. २ दिवसांत या ग्रंथपालांचे वेतन पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिल्याचे मोते यांनी सांगितले.शाळांमधील अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप मोते यांनी केला होता. आदेशामुळे अर्धवेळ ग्रंथपालांवर बेकार होण्याची भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात मंगळवारी त्यांनी संबंधित शाळांच्या ग्रंथपालांसह मुंबई शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांची भेट घेतली. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर न्यायालयाने संच मान्यतेस स्थगिती देत ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. असे असूनही अर्धवेळ ग्रंथपालांचे वेतन देयके न स्वीकारण्याचे धोरण शिक्षण निरीक्षक कार्यालयाने घेतले होते. मुंबईतील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार अर्धवेळ ग्रंथपाल मंजूर आहेत. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने संबंधित शाळांना अर्धवेळ ग्रंथपालांचे पद मंजूर होऊ शकत नाही, या कारणास्तव या ग्रंथपालांचे वेतन थांबविले होते.
अर्धवेळ ग्रंथपालांच्या वेतनाचा मार्ग मोकळा
By admin | Published: December 02, 2015 2:35 AM