पुणे : शहराच्या विविध भागांत मोफत वायफायच्या घोषणा अनेक नगरसेवकांनी केल्या असल्या, तरी त्याचा किती वापर होतोय, हे समजत नसले तरी पुणे रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफायचा आनंद तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर घेत असून, त्यांचे अनुकरण इतरही प्रवासी करताना दिसून येत आहे़ पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या; तसेच दौंडपर्यंत जाणाऱ्या गाड्यांसाठी अनेकदा प्रवाशांना वाट पाहावी लागते़ त्यामुळे या मधल्या वेळेत फ्री वायफायचा आनंद घेता येत आहे़ रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेलटेल कॉर्पोरेशन ही कंपनी असून, तिच्यामार्फत देशातील अनेक रेल्वे स्थानकावर वायफायची उभारणी करण्यात येत आहे़ त्यानुसार पुणे रेल्वे स्टेशनवरही वायफाय उभारणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर ही मोफत सुविधा कशी वापरायची, यासंबंधीची माहिती देणारे फलकही प्लॅटफॉर्मवर लावण्यात आले आहेत़ या फलकावरील माहिती वाचून तरुण-तरुणी; तसेच अन्य प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत़ रेलटेल कॉर्पोरेशनने उभारलेली ही सुविधा अद्याप प्रायोगिक तत्त्वावर असून, काही दिवसांनी त्याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे़ सध्या ही सुविधा पहिली ३० मिनिटे मोफत आहे़ त्यानंतर तुम्ही ती वापरली तर त्यासाठी पैसे पडतात़ (प्रतिनिधी)
रेल्वे प्रवाशांना फ्री-वायफाय
By admin | Published: June 23, 2016 2:33 AM