ठाणे : आम्ही शालेय शिक्षण घेत होतो तो आणि आजचा काळ यात फरक आहे. आज काळ बदलला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत दोन-तीन वेळा शिक्षा केली की त्याचे पालक शिक्षकांना जाब विचारतात. हल्ली शाळांमधून होणाऱ्या पॅरेंटस् मिटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीपेक्षा पालक शिक्षकांनाच आमच्या मुलाला कमी मार्कस् का दिले, कार्यक्रमात का घेतले नाही, असे प्रश्नच जास्त विचारतात. पूर्वीच्या शिक्षकांना जे स्वातंत्र्य होते ते आजच्या शिक्षकांकडे दिसत नाही. त्यांचे स्वातंत्र्यच हिरावून घेतले आहे, असे परखड मत न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यात व्यक्त केले.मो. ह. विद्यालयच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा शुभारंभ बुधवारी शाळेच्या प्रांगणात झाला. २ नोव्हेंबर २०१६ ते २ नोव्हेंबर २०१७ असे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याचा शुभारंभ बुधवारी झाला. बाळासाहेब चितळे या समारंभाचे अध्यक्ष होते. तर विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले अभय ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मो.ह.विद्यालय कधीही उच्चभ्रू समाजाची शाळा म्हणून ओळखली गेली नाही. सर्व समाज, स्तरातील विद्यार्थ्यांना या शाळेने, शाळेतील शिक्षकांनी आपलेसे केले. आम्ही आमच्या काळातील शिक्षकांचे इतके कौतुक करतो म्हणून आजच्या शिक्षकांना कमी लेखून चालणार नाही. त्याकाळी एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा केली की शिक्षकांनी योग्य कारणास्तवच केली असेल यावर पालक ठाम असायचे. किंबहुना काही पालक तुम्ही आमच्या पाल्याला अधिक शिक्षा करा पण त्याला शिस्त लावा, असे सांगायचे. मात्र, आजची परिस्थिती तशी नाही. १९६०-७० च्या दशकातील मापदंड आताच्या शिक्षकांना लावले तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल, असेही ओक म्हणाले. या कार्यक्रमाला शाळेचे माजी-आजी शिक्षक, विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले आणि आज विविध क्षेत्रात यशवंत ठरलेल्या राजगोपाल नोकजा, न्यायमूर्ती विजय टिपणीस, हेमचंद्र प्रधान, संजय जाधव, नुबैरशाह शेख, डॉक्टर आनंद घैसास, चंद्रशेखर वावीकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य राजेंद्र राजपूत, रविकांत ठाणावाला, श्रीकृष्ण अक्षीकर, रविंद्र तामरस, बाळासाहेब खोल्लम, सुनील पाटील, प्रदीप राका आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांचे स्वातंत्र्यच हिरावले गेले !
By admin | Published: November 04, 2016 3:23 AM