रत्नागिरी : जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याचा सामंजस्य करार झाल्याने हे बंदर येत्या काही कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मालवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत न्हावा-शेवा (मुंबई), जे. एन. पी. टी. व गोवा या मोठ्या बंदरांवर मालवाहतुकीचा मोठा भार आहे. जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडले जाणार असल्याने अन्य बंदरांवरील मालवाहतुकीचा भार कमी होणार आहे. डिंगणी ते जयगड पोर्ट असा ३४ किलोमीटर्सचा मालवाहतूक रेल्वेमार्ग होणार आहे. जिल्ह्यातील धामणखोल-जयगड येथे बहुउद्देशीय बारमाही चालणारे बंदर जयगड पोर्ट लिमिटेड या खासगी विकासकामार्फत विकसित केले जात आहे. जलवाहतूक ही सर्वांत स्वस्त, परवडणारी वाहतूक म्हणून जगभरात ओळखली जाते. त्यामुळे राज्यातील न्हावा-शेवा, जेएनपीटी व गोवा बंदरातून मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरील मालवाहतूक करणारी जहाजे नेहमीच दाखल होत आहेत. परिणामी तीनही बंदरांवर कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नवीन बंदराची शासनाला तसेच जागतिक क्षेत्रातील आयात-निर्यातदार कंपन्यांनाही प्रतीक्षा होती. जयगड बंदर ही अपेक्षा पूर्ण करू शकते. यातूनच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर विकसित करण्याचा विचार पुढे आला. त्यासाठीच गेल्या दोन-तीन वर्षांपासून जयगड बंदर कोकण रेल्वेला मालवाहतूकीच्या दृष्टीने जोडले जावे, याबाबत कोकण रेल्वे व शासनाबरोबर या कंपनीची चर्चा सुरू होती. हा मार्ग रत्नागिरी स्थानकापासून उक्षी किंवा भोके येथून पुढे जयगड बंदराला जोडला जावा, असा प्रारंभीचा सूर होता. मात्र, नंतर हा विचार बदलला असून, आता कोकण रेल्वेमार्गावरील डिंगणी (संगमेश्वर) येथून हा मालवाहतुकीचा एकेरी मार्ग जयगड बंदराला जोडण्याचा सामंजस्य करार राज्य सरकारच्यावतीने मेरिटाइम बोर्ड, कोकण रेल्वे महामंडळ व जयगड पोर्ट लि. यांच्यादरम्यान सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. त्यामुळे जयगड बंदर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलवाहतुकीचे कोकणातील मोठे केंद्र बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोकण रेल्वेला जोडले गेल्याने जयगड बंदरात येणाऱ्या देश-विदेशातील जहाजांतील मालाची ने-आण रेल्वेने करणे शक्य होईल. जयगड पोर्ट ही कंपनी यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बंदरात येणाऱ्या जहाजांकडून भाडे आकारणी करणार आहे. तसेच रेल्वे माल वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जयगड परिसरात वाहतुकीशी निगडीत व्यवसायांनाही बरकत येणार आहे. (प्रतिनिधी)
जयगड होणार मालवाहतूक केंद
By admin | Published: December 02, 2014 10:52 PM