एकत्र परिवार असतानाही कौटुंबिक कलहाची वारंवार अफवा; अजित पवार संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:13 PM2019-09-28T16:13:23+5:302019-09-28T16:14:05+5:30
अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली.
मुंबई : काल मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिला. यामुळे माझ्या वरिष्ठांना, हितचिंतकांना वेदना झाल्या. मी उपमुख्यमंत्री असतानाही असाच एक प्रसंग आला होता. मी कोणालाही न विचारता राजीनामा दिला होता. कालही हाच प्रकार केला. मी कार्यकर्त्यांचीही माफी मागतो, असे अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली.
विधानभवनामध्ये मी 5.30 च्या सुमारास गेलो. विधानसभाध्यक्ष बागडेंच्या पीएकडे राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी मी त्यांना फोन केलेला, की तुम्ही मुंबईत कधी आहात असे विचारले होते.
मी राज्य बँकेचा संचालक होतो. शरद पवार हे माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांचे नाव घेण्यात आले. राज्य बँकेने एखाद्या गिरणीला, कारखान्याला पैसे दिले ते त्यांनी कसे खर्च केले त्याची चौकशी केली तर मला काही आक्षेप नाही. अन्याय झाला तर न्यायपालिका आहेत. त्यांनी त्यांना हवा तो तपास करावा. मात्र, 2008 चे प्रकरण असताना आज निवडणुकीच्या काळात का गुन्हा दाखल केला. यामुळे शरद पवारांना या गोष्टीचा त्रास झाला, असेही त्यांनी सांगितले.
मी सकाळी मुंबईकडे निघालो. मात्र, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे निघाल्याने टोल नाक्यांवर माझे दोन दोन तास गेले. दुपारी 2 वाजता मी मुंबईत पोहोचलेलो. तोपर्यंत ईडीकडे न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. त्यामुळे माध्यमांनी लगेचच अजित पवार आले नसल्याची विचारणा सुरू केली. राजीनामा दिल्यानंतर मी मुंबईतील एका नातोवाईकाकडे थांबलो. शरद पवारांनी मला भेटण्यास सांगितले. आमच्यात कौटुंबीक कलह कुठून आले? असा सवालही त्यांनी केला.
हे थांबवा...
मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हाही आमच्यात कलह असल्याची चर्चा केली गेली. शरद पवार आणि अजितदादा यांचे दोन गट असल्याचे बोलले गेले. सुप्रिया राजकारणात आली तेव्हाही हेच घडले आणि आताही तेच. पवार कुटुंब मोठा परिवार आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत तेव्हा हे कृपया थांबवा असे आवाहन अजित पवार यांनी केले.