मुंबई : शालेय पोषण आहार योजना राबविणाऱ्या महिला बचत गट व संस्थांची थकीत बिलांची त्वरित पूर्तता करणे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबई व कोकण विभागीय महिला औद्योगिक सहकारी संस्था महासंघातर्फे शुक्रवारी (दि. १०) दादर येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पोषण आहाराची कंत्राटे मिळविणाऱ्या बचत गटातील महिलांना शासन वर्ष-वर्षभर बिले देत नाही. काही संस्थांची तर १० वर्षांपासून बिले थकीत आहेत. त्याशिवाय कमिशन घेतल्याशिवाय अधिकारी बिले मंजूर करीत नाहीत, असा सार्वत्रिक अनुभव आहे. शासनाने तातडीने प्रलंबित बिले बचत गटांना द्यावीत, घातलेल्या अनेक जाचक अटी शासनाने शिथिल कराव्यात, यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी मोर्चा काढण्यात येईल, असे महासंघाच्या अध्यक्षा जयश्री पांचाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोषण आहाराच्या थकीत बिलासाठी बचत गटाचे शुक्रवारी आंदोलन
By admin | Published: March 07, 2017 1:50 AM