मुंबई : केंद्र आणि राज्यातही सत्ता नसलेल्या महाविकास आघाडीकडे इतर लहान पक्ष जात असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत होते. पण, माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर सोबत येता येता अचानक महायुतीसोबत गेले. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आता अंतर राखले असल्याचे चित्र आहे. तिसरे महत्त्वाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता कमी कमी होत चालली आहे.
शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे भाजपचे मोठे मित्रपक्ष. या शिवाय तुलनेने लहान असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, जानकर यांचा रासप, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आ. विनय कोरे यांची जनसुराज्य पार्टी, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांचा बहुजन रिपब्लिकन एकता मंच हेही भाजपचे मित्रपक्ष आहेत.
आठवले यांनी महायुतीकडे लोकसभेच्या दोन जागा मागितल्या होत्या, पण त्यांना एकही मिळाली नाही. जानकर आधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले आणि ते महाविकास आघाडीत जाणार असे चित्र निर्माण झाले. मात्र जानकरांनी यू टर्न घेत महायुतीतच राहणे पसंत केले.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे सहा जागा मागितल्या आहेत. आघाडीने त्यांना पाच जागा देऊ केल्याचे आता म्हटले जात आहे. आंबेडकर यांनी मंगळवारी ‘एक्स’वर असे म्हटले की, माझ्या आजोबांनी चालविलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती. लाचारी मी मान्य करणार नाही. आघाडीत अडचणी येऊ नयेत म्हणून व्यक्तिगत हेवेदावे आम्ही येऊ दिले नाहीत, पण चळवळीलाच लाचार केले जात असेल, तर ते कदापिही मान्य करणार नाही. आंबेडकर यांच्या या विधानांचा रोख काँग्रेस-राष्ट्रवादीवर असल्याचे मानले जाते.
...म्हणून शेट्टींनी राखले अंतर राजू शेट्टी महाविकास आघाडीत न जाण्याचे कारण वेगळे आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रमुख घटकपक्ष असलेल्या या आघाडीत आपण गेलो तर साखर कारखानदारांच्या नेत्यांशी पुन्हा एकदा जवळीक केली अशी टीका होईल आणि आपला मतदार आपल्यापासून दुरावेल, असे वाटत असल्याने ते जाणीवपूर्वक महाविकास आघाडीपासून दूर राहत आहेत. शिवसेनेने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. परंतु तुम्ही मला पाठिंबा द्या, पण मी महाविकास आघाडीमध्ये येणार नाही, असे राजू शेट्टी यांचे म्हणणे आहे.