नवी मुंबई : फेसबुक व व्हॉट्सअॅपवर आफ्रिकन तरूणाशी केलेली मैत्री नवी मुंबईमधील महिलेला चांगलीच महागात पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्या तरूणाने तोतया कस्टम अधिकाऱ्यासह एकूण तिघांनी सदर महिलेची ७ लाख रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आफ्रिकेमध्ये वास्तव्य करत असल्याचे सांगून एका व्यक्तीने फेसबुकवरून नवी मुंबईमधील तरूणीशी मैत्री केली. फेसबुकवरील संभाषणातून चांगली मैत्री झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवरून नियमित संवाद सुरू झाला. युवतीबरोबर प्रेमाचे नाटक करून लग्न करण्याचे आश्वासन दिले. आफ्रिकेमधून लॅपटॉप, मोबाइल, महागडे कपडे व २० हजार पाऊंड्स पाठवत असल्याचे त्याने सांगितले. काही दिवसांनी अमीतकुमार नावाच्या व्यक्तीचा त्या महिलेस फोन आला.
कस्टम अधिकारी असल्याचे सांगून आफ्रिकेमधून लाखो रूपयांचे साहित्य आले असल्याचे सांगितले. हे साहित्य ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले. महिलेचे मन वळवून तिला एका बँकेतील अनोळखी व्यक्तीचा खाते नंबर सांगितला. महिलेने संबंधित अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून ७ लाख ४० हजार रूपये बँकेत जमा केले. पैसे जमा केल्यानंतर ते तत्काळ हडप करून तिघांनी महिलेची फसवणूक केली आहे. लग्नाचे आमिष दाखविलेल्या तरूणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होवू शकला नाही. यामुळे बँकेत चौकशी केली असता संबंधित खात्यात पैसेच नसल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याविषयी वाशी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
फेसबुकवर फे्रंडलिस्टमध्ये किती व्यक्ती आहेत हे दाखविण्यासाठी अनेक जण ओळख नसलेल्यांची फे्रंडशीप रिक्वेस्ट मान्य करतात. अनोळखी व्यक्तींशी संभाषण केले जाते. व्हॉट्सअॅपवरही फारशी ओळख नसणाऱ्यांशी तासन्तास गप्पा मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याचा गैरफायदा घेवून फसवणूक केली जात आहे. याशिवाय मेल करून लाखो रूपयांची लॉटरी लागली असल्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून अशा सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.