अकोला : महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढण्याची तयारी केली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून आघाडीचे गुऱ्हाळ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी बसवराज पाटील यांनी योग्य प्रस्ताव आल्यास काँग्रेससह समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा विचार आहे, असे शनिवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखविल्यावर रविवारी काँग्रेसच्या पार्लेमेंटरी बोर्डानेही आघाडी करण्याबाबतचा ठराव एकमताने पारित केला. महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेस- राष्ट्रवादी-काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीकरूनच लढत आहेत. गेल्या वेळी काँग्रेसने ४७ जागा लढवित १८ तर राष्ट्रवादीने २६ जागांवर लढत देत ५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी दोन्ही पक्ष सत्तेत होते. आता परिस्थिती बदलली आहे. भाजप स्वबळाची तयारी करीत आहे. त्यामुळे भाजपाच्या आक्रमक पवित्र्याला लढत देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीची गरज आहे. खरेतर राष्ट्रवादीने स्वबळाची तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी काँग्रेसच्या सहा नगरसेवकांना राष्ट्रवादीत सामील करून घेत काँगे्रसची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीची स्थिती मजबूत झाली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबनराव चौधरी यांना विरोध करणारी एक मोठी फळी काँग्रेसमध्ये आहे. ही फळी सध्या ‘शांत’ आहे; मात्र त्यांची शांतता ही वादळापूर्वीची शांतता ठरू शकते, अशी स्थिती आहे. मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसची मोठी ताकद आहे; त्यातच आता एमआयएम ४० जागा लढविण्याची तयारी करत आहे.
अकोल्यात आघाडीचे गुऱ्हाळ सुरूच
By admin | Published: January 24, 2017 4:18 AM