पुणे : मतदान यंत्रात हेराफेरी केल्याचा आरोप करीत महापालिका निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मोर्चा काढला. भाजपा वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवार मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मतदान यंत्राची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली व त्याचे दहन करण्यात आले.उपमहापौर मुकारी अलगुडे (काँग्रेस) स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नीलेश निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), रूपाली पाटील, किशोर शिंदे (मनसे), दत्ता बहिरट, मिलिंद काची (काँग्रेस), धनंजय जाधव (भाजपा बंडखोर) या राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अन्य अनेक उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मतमोजणी आधीच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज जाहीर करणाऱ्या भाजपाच्या खासदारांचा यावेळी धिक्कार करण्यात आला. त्यांना आधीच निकाल कसा समजला, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू केमसे व अन्य अनेक उमेदवारांनी केली. (प्रतिनिधी)>फेरनिवडणुकीची मागणीनागरिकांच्या मतांची चोरी करणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा, ईव्हीएम घोटाळा हीच का भाजपाची पारदर्शकता अशा विविध घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. बालगंधर्व रंगमंदिरापासून मतदान यंत्रांची अत्यंयात्रा काढण्यात आली. नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. फेरनिवडणूकीची मागणी सर्व पराभूत उमेदवारांनी केली.>भाजपाचा हाच पारदर्शक कारभार का?भाजपाच्या विरोधात बंड करून पत्नीसाठी शिवसेनेची उमेदवारी घेणारे भाजपाचे नगरसेवक धनंजय जाधव हेही या मोर्चात सहभागी होते. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीस उभ्या राहिलेल्या त्यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. लोकशाही मार्गाने विजय मिळणार नाही, याची खात्री असल्याने भाजपाने मतदान यंत्रात फेरफार करून हा विजय मिळवला आहे, असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब बोडके, केमसे आदींनीही यावेळी भाजपावर आरोप केले. भाजपा सरकारचा हाच का पारदर्शक कारभार, अशी टीका करण्यात आली.बालगंधर्व ते वैकुंठ असा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यात मतदान यंत्रांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा नेण्यात येणार होती. बालगंधर्व रंगमंदिराजवळ गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी मोर्चा वैकुंठापर्यंत नेण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे छत्रपती संभाजी उद्यानापर्यंतच मोर्चा नेण्यात आला व तिथे मतदान यंत्रांचे दहन करण्यात आले. प्रत्यक्ष झालेले मतदान व मतदान यंत्राद्वारे मोजणी झालेले मतदान याच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यासंबधीची सर्व कागदपत्रे जमा करून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय मोर्चातील पराभूत उमेदवारांनी घेतला.
पराभूत उमेदवारांचा मोर्चा
By admin | Published: March 01, 2017 1:13 AM