लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेऊन बाहेर पडलेले आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमोरच आप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण वाढत गेल्याने कार्यकर्ते आरोग्यमंत्र्यांना न जुमानता हातघाईवर आले. या प्रकाराने पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आरोग्यमंत्री डॉ. सावंत बुधवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. याअंतर्गत त्यांनी गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली. स्त्री रुग्णालयातील ‘ह्युमन मिल्क बँके’चे उद्घाटन केल्यानंतर आरोग्यमंत्री अधीक्षक कक्षाबाहेर निघाले. त्याचदरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला व पाठ्यनिर्देशिका तारा शर्मा यांना बडतर्फ करून जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. आप पदाधिकारी आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करीत असतानाच शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आप कार्यकर्त्यांनीही मग आरोग्यमंत्र्यांविरुद्ध नारेबाजी सुरू केली. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी होऊन प्रकरण हातघाईवर आले. आम आदमी पक्षाच्या रोशन अर्डक यांनी यासंदर्भात गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सेनेचे सुनील खराटे, सुधीर सूर्यवंशी व सुनील भालेरावविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.आमदारांसमोर हाणामारीजिल्हा स्त्री रुग्णालयात हा राडा सुरू असताना आ. सुनील देशमुख व आ. अनिल बोंडे हेदेखील तेथे पोहोचले. दोन्ही आमदारांसमक्षच आप-सेनेमध्ये हाणामारी झाली. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगरसुद्धा उपस्थित होते.
आरोग्यमंत्र्यांसमोरच ‘सेना-आप’मध्ये राडा
By admin | Published: July 07, 2017 4:20 AM