ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 26 - चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या घटनेस जवळपास ५० दिवस उलटूनही आरोपीस न पकडल्याने व मुलीचाही तपास नसल्याने या मुलीच्या आई- वडिलांनी पोलीस स्टेशनसमोर किटकनाशक घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ३ एप्रिल १७ रोजी मेहुणबारे पोलिसांत तक्रार दिली असून हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. गावातीलच शेख शोएब या तरुणाने तिला पळविल्याची फिर्याद नोंद असून त्याच्या आई- वडिलांचे तसेच काकाचे त्यास सहकार्य आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, तपासकामी पोलिसांचे सहकार्य नसल्याचेही मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
आतापर्यंत अनेकदा निवेदने देवूनही उपयोग न झाल्याने २४ निवेदन देवून २६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा संबंधिताना निवेदनाद्वारे दिला होता. यामुळे २६ रोजी सकाळपासून पोलीस स्टेशनसमोर तगडा बंदोबस्त ठेवला होता. मात्र हुलकावणी देत मुलीचे आई - वडील या दोघांनी किटकनाशक घेवून २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना लगेच अटक करुन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती जास्त खालावल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले आहे. या घटनेनेची गावात जोरदार चर्चा आहे.