बारामती (पुणे) : अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ बारामती शहरात गुरुवारी बहुजन समाजाने विराट क्रांती मोर्चा काढला. दलित, ओबीसी, मुस्लिम समाजातील बांधव लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कोपर्डीसह देशातील अन्य बलात्काराच्या घटनांमधील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी करीत हा मोर्चा निघाला.शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. कसबा येथील शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील इंदापूर चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, गुणवडी चौक, भिगवण चौक मार्गे मोर्चा मिशन हायस्कूलच्या भव्य मैदानावर स्थिरावला. या वेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात मागासवर्गीयांसह मुस्लिम, धनगर समाजबांधवांसह महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उन्हाचा तडाखा तीव्र असतानादेखील मोर्चातील उपस्थितांची संख्या लक्षणीय होती. मोर्चाचे संयोजक अॅड. विजय गव्हाळे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. अनेक वर्षे सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबविल्या नाहीत? असे गव्हाळे म्हणाले. प्रस्थापित राजकीय नेतेच साखर सम्राट, दूध सम्राट आणि शिक्षणसम्राट आहेत. त्यांनीच शिक्षण महाग केले. या प्रस्थापितांना खऱ्या अर्थाने जाब विचारण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. परंतु आरक्षण मागण्याची वेळ का आली, याचे आत्मपरीक्षणदेखील त्यांनी करावे. असेही गव्हाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘अॅट्रॉसिटी’ कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, इतर मागासवर्गीयांना या कायद्याच्या कक्षेत घ्यावे, मराठा, धनगर मुस्लिमांना आरक्षण मिळावे, कोपर्डीसह राज्यात त्यापूर्वी घडलेल्या बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, गोररक्षणाच्या नावाखाली होत असलेले अत्याचार थांबवावेत, मागासवर्गीयांचा नोकऱ्यांतील अनुशेष भरून काढावा, मागासवर्गीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी हेमंत निकम यांना देण्यात आले.हा ‘प्रति मोर्चे’ नाही, तर हा ‘मैत्री मोर्चा’ आहे. मात्र, कोपर्डीच्या प्रकरणाचा निषेध करीत असताना चुकीच्या पद्धतीने अॅट्रॉसिटी कायद्याची मांडणी केली जाते.- सूर्यकांत वाघमारे,जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पक्ष
‘अॅट्रॉसिटी’च्या समर्थनासाठी मोर्चा
By admin | Published: October 07, 2016 5:52 AM