ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 06 - मिरजेतील खराब रस्त्यांवरील अपघातामुळे होणा-या दुखापतींबाबत मिरज सुधार समितीतर्फे गुरुवारी प्रतीकात्मक जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यापासून महापालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्ते व्हीलचेअरवरून सहभागी झाले होते.
मिरज मार्केटसह उपनगरातील सर्व अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यात वाहने आदळून दररोज अपघात होऊन दुखापती होत आहेत. खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनास वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांबाबत दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शहर सुधार समितीतर्फे प्रतीकात्मक जखमी अवस्थेत मोर्चा काढून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
गणेश तोडकर, सचिन गाडवे, मुस्तफा बुजरूक, शकील पिरजादे, असिफ पठाण, राज कबाडे, सुधीर गोखले, अरिफ काझी, जहीर मुजावर, धनराज सातपुते, सुनील मोरे, धनंजय भिसे, शफीक सय्यद, जैलाब शेख आंदोलनात सहभागी झाले होते.
मुख्य रस्तेही खड्डेमय
शहरातील विस्तारीत भागात ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाने शहर व उपनगरांतील रस्त्यांची दैना उडाली आहे. उपनगरातील कच्च्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक, सुखनिवास कोपरा ते आंबेडकर पुतळा या प्रमुख रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून व खड्ड्यांतून ये-जा करणा-या वाहनधारकांचा अपघात होऊन अनेकजण जखमी झाले. शहर व उपनगरातील ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यांवर चिखल निर्माण होऊन या चिखलातून वाट काढावी लागत आहे.
पंधरा दिवसात खड्डे भरू
आंदोलकांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना रस्ते दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन दिले. पंधरा दिवसात रस्त्यावरील खड्डे भरण्यात येतील. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे मुरूमाने भरू. पावसाळ्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
व्हीलचेअर, वॉकर, बॅन्डेज दुकानदारांकडून
पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे मुरूमीकरण व पाण्याच्या निचºयाबाबत उपययोजना केली नसल्याने नागरिक संतप्त आहेत. सुधार समितीने रस्ते दुरुस्तीबाबत महापालिकेस तीन वेळा निवेदन दिल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नसल्याने समितीतर्फे अभिनव पध्दतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना जखमींसाठी वापरण्याची व्हीलचेअर, वॉकर, बॅन्डेज व इतर साहित्याचा दुकानदारांनी पुरवठा केला होता.