ठाणे : येथील सुप्रसिद्ध हॅब टाऊन ग्रीनवूड या सोसायटीच्या बिल्डरने पाच वर्ष विलंब करूनही रहिवाशांना त्यांच्या घरांचा ताबा दिला नाही. याशिवाय उर्मटपणे वागणूक देणाऱ्या या बिल्डर्सच्या मनमानी विरोधात संतप्त शेकडो रहिवाशांनी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले. वर्तकनगर, उपवन रोड येथे सुरू असलेल्या या हॅब टाऊन सोसायटीच्या साईट वरून निघालेला हा मोर्चा सिव्हील हॉस्पीटल, सेंट्रल मैदान येथून आला असता त्यास येथील शासकीय विश्रामगृहाजवळ आडविण्यात आला. आमदार संजय केळकर यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या मोर्चाच्या शिष्टमंडळातील अनुराधा कदम, नफिसा बरोडावाला, संजय शर्मा, गोरख महाडीक या रहिवाशांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.या हॅब टाऊन हाऊसिंग सोसायटीचे बांधकाम उपवन रस्त्यावर सुरू आहे. या रहिवाशांनी कर्ज काढून बिल्डर्सला घराची संपूर्ण रक्कम भरली आहे. सुमारे २००९ पासून बुकिंग केलेल्या या घरांचा ताबा २०११ पर्यंत देण्याचे बिल्डर्सने सांगितले होते. मात्र, अद्यापही तो न देता उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्याा या बिल्डरच्या विरोधात सर्व रहिवाशी या सोसायटीच्या साईटवर मंगळवारी एकत्र आले आणि त्यांनी एकमत करून उत्स्फुर्तपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या तक्रारीस अनुसरून चौकशीचे आदेश देण्याचे आाश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या रहिवाशांना दिले. (प्रतिनिधी)
बिल्डरविरोधात संतप्त रहिवाशांचा मोर्चा
By admin | Published: May 18, 2016 3:10 AM