सायगाव : आनेवाडी येथील रहिवासी व भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयाच्या निषेधार्थ आनेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी मोर्चा काढला. यावेळी पाकविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चातग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी जाधव यांनी शेती खरेदी करून येथील शेतात घर बांधले होते. तेथे कुटुंबीयांसमवेत राहत असलेले जाधव हे या ठिकाणी सामाजिक कामाने अल्पावधित परिचित झाले होते. ग्रामस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध झाले होते. कुलभूषण जाधव हे प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेत. त्यामुळेच आनेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांच्या सुटकेसाठी तसेच पाकिस्तानने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान हाय-हाय, नवाज शरीफ मुर्दाबाद,’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. कुलभूषण जाधव यांच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून, त्यांना यामध्ये गोवण्यात आले आहे. भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात सरपंच अश्विनी शिंदे, उपसभापती सदाशिव टिळेकर, अध्यक्ष बबन फरांदे, सचिन शेवते, जयदेश जगताप, सुभाष पाडळे, संतोष पिसाळ, उमेश तोडरमल, शिवाजी फरांदे, प्रभाकर गोरे, स्वप्नील कदम, अविनाश फरांदे, विश्वास पवार,भीमा कोळी, निखिल फरांदे, श्वेतेश फरांदे यांच्यासह ग्रामस्थ युवक, रिक्षा संघटना मोर्चात सहभागी होते. (वार्ताहर)गृहमंत्री, परराष्ट्र मंत्र्यांना निवेदनआनेवाडी परिसरातील लोकांना देशसेवेचे धडे देणारे जाधव असे काही करणारे असतील, असे मुळीच वाटत नाही. मुळात पाकिस्तानी सरकारने खोट्या आरोपाखाली त्यांना अटक केली असल्याने भारत सरकारनेही यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन त्यांच्या सुटकेसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना आनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन पाठवण्यात येणार आहे, असे यावेळी सांगिण्यात आले. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. पाकिस्तानबरोबर असणारे सर्वच संबंध भारताने तोडून टाकावेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकची मुस्कटदाबी करावी.- जयदेश जगताप, ग्रामस्थ, आनेवाडीकुलभूषण जाधवांसाठी साताऱ्यातील युवा वर्ग एकत्र; स्वाक्षरी मोहिमेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांची मुक्तता व्हावी, यासाठी साताऱ्यातील युवा वर्ग एकत्र आला आहे. कोणत्याही परिस्थितीत जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करावी, या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तान सरकारने रचलेल्या कथित आरोपाबाबत जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. साताऱ्यातही याचे पडसाद उमटत असून, विविध स्तरांतून पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. साताऱ्यातील युवा वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आला आहे. ‘चला वाचवू कुलभूषण जाधवांचे प्राण’ अशा आशयाखाली युवकांनी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या निषेधार्थ मोहीम उघडली आहे. या मोहिमेला युवा वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. युवकांनी शहरातून स्वाक्षरी मोहीम राबविली असून, या स्वाक्षरी मोहिमेचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयामध्ये जाऊन ‘कुलभूषण जाधवांची फाशी रोखण्यासाठी पुढे या,’ असा संदेश दिला जात आहे. प्राध्यापक, शिक्षकांनाही आवाहन करण्यात येत आहे. ‘अजून वेळ गेली नाही. तोपर्यंतच एकत्र या, आणि शासनाला आपल्या भावना पोहोचण्यासाठी आपले मत कळवा,’ असे भावनिक आवाहनही युवकांकडून करण्यात येत आहे.
पाकच्या निषेधार्थ आनेवाडी ग्रामस्थांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 11:33 PM