मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारपासून निवडणूक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले असून, विद्यार्थी संघटनांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यार्थी संघटनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान सिनेट सदस्यांसह इच्छुकांचीही धावपळ वाढली आहे.विद्यापीठाच्या १० पदवीधर सदस्यांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे सिनेट निवडणूक डोळ््यासमोर ठेवून पदवीप्राप्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी रणनीती आखण्यास सुरू केली आहे.या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मनविसे, युवा सेना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, स्टुटंड फेडरेशन आॅफ इंडिया, एनएसयूआय, प्रहार आदी संघटना जोमाने उतरणार आहेत. सध्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेनेचे वर्चस्व आहे. परंतु युवा सेना पदाधिकाऱ्यांमध्येच धुसफूस असल्याचा फटका युवा सेनेला निवडणुकीत बसू शकतो. मनविसेला अनेक पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने आणि काही नाराज असल्याने याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. दुसरीकडे अभविपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या संघटनेला विद्यार्थ्यांची किती पसंती मिळतेय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्याचप्रमाणे इतर संघटनाही जोमाने निवडणूक तयारीला लागल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. युवा सेना, मनविसे, अभविप या संघटनांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थी संघटनांकडून मोर्चेबांधणी
By admin | Published: July 02, 2015 1:03 AM