३० जानेवारीला होणार पोटनिवडणूकमुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या राजीनाम्यामुळे आणि राष्ट्रवादीचे विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी ३० जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार या चारही जागा भाजपा-शिवसेना युतीला मिळू शकतात.केंद्रीय निवडणूक आयोग १३ जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना जारी करणार असून, तेव्हाच या चारही जागांसाठी एकत्रितपणे मतदान होणार की वेगवेगळे हे स्पष्ट होईल. एकत्रितपणे मतदान झाले नाही, तर युतीच्या तीन जागा सहज निवडून आणत चवथ्या जागेसाठी एखाद्या बलाढ्य अपक्ष उमेदवाराला रिंगणात उतरवून त्याने अपक्षांची व काँग्रेस-राष्ट्रवादीची मते खेचून आणावीत, अशी रणनीती युतीकडून आखली जावू शकते.कोणता कार्यकाळ कोणाला ?भाजपा-शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. ही पोटनिवडणूक असल्याने आधीच्या सदस्यांचा आमदारकीचा उर्वरित कार्यकाळच नव्या आमदारांना मिळेल. पृथ्वीराज चव्हाण आणि विनायक मेटे या दोघांचा कार्यकाळ ७ जुलै २०१६ रोजी संपणार आहे. विनोद तावडे यांच्या जागेचा कार्यकाळ २४ एप्रिल २०२० पर्यंत तर आशिष शेलार यांच्या जागेचा कार्यकाळ २७ जुलै २०१८ पर्यंतचा असेल. कोणत्या जागेसाठी कोणाला उमेदवारी दिली हे अर्जासोबत नमूद करावे लागणार आहे. त्यामुळे चव्हाण, मेटेंच्या जागेवर निवडून आलेल्यांना एक वर्ष पाच महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे. तावडे, शेलार यांच्या जागी आमदार होणाऱ्यांना मोठा कार्यकाळ मिळेल. शिवसेनेकडून सुभाष देसाई यांची वर्णी लागेल. (विशेष प्रतिनिधी)प्रत्येक जागेकरिता स्वतंत्र मतदान झाले तर निवडून येण्यासाठी मतांचा कोटा हा १४५चा असेल. एवढे संख्याबळ केवळ भाजपा-शिवसेना युतीकडे आहे. त्यामुळे चारही जागा युतीच्या झोळीत पडतील. एकत्रितपणे मतदान घेतले तर मतांचा कोटा हा ५८ मतांचा असेल. त्या परिस्थितीत विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपाच्या दोन, शिवसेनेची एक व काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढल्यास दोनपैकी एका पक्षाला एक जागा मिळू शकेल.
विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: January 09, 2015 2:19 AM