एसपी़ शिंदे,
डोंगरशेळकी (जि. लातूर)- उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावाचे नाव उच्चारले की जिभेवर तरळते ती येथील प्रसिद्ध खव्याची लज्जत़ एक-दोन नव्हेतर तब्बल ७०पेक्षा अधिक कुटुंबे जीवापाड मेहनत घेऊन दर्जेदार खवानिर्मितीच्या व्यवसायात आहेत़ परंतु, यंदा पाऊस नसल्याने या भागातील दुग्धोत्पादन घटले असून, त्याचा मोठा परिणाम खवा उत्पादनावर झाला आहे़ सध्या सरासरीच्या १० टक्केही उत्पादन होत असल्याने डोंगरशळकीकरांची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.श्री समर्थ धोंडूतात्यांच्या वास्तव्याने डोंगरशेळकी गावाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे़ गाव डोंगरदऱ्यांच्या रांगांमध्ये वसलेले असल्याने शेती माळरानच़ त्यामुळे पदरी फारसे काही पडतच नाही़ मात्र, चाऱ्याची उपलब्धता असल्याने पशुधन व्यवसाय भरभराटीला आला़ मोठ्या प्रमाणात दुग्धोत्पादन होऊ लागल्याने एकेक करीत तब्बल ७०पेक्षा अधिक पशुपालकांनी खवानिर्मितीच्या व्यवसायात उडी टाकली़ शुद्ध दुधाद्वारे दर्जेदार खवा डोंगरशेळकीत तयार होऊ लागला़ व्यवसायात प्रामाणिकपणा व दर्जा जपल्याने अल्पावधीतच येथील खव्याने बाजारपेठेत चांगला जम बसविला़ संपूर्ण जिल्हाभरात कुठेही खव्याची मोठी गरज असल्यास रात्रीतून ती पूर्ण करण्याची क्षमता डोंगरशेळकीने जपली़ त्यामुळे खवा म्हटले की पहिल्यांदा डोंगरशेळकीचे नाव ओठावर येऊ लागले़ या व्यवसायातून गावातील ७०पेक्षा अधिक कुटुंबे स्थिरस्थावर झाली़ त्यांची संपूर्ण उपजिविकाच या व्यवसायावर स्थिर झाली़ दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांपासून या भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले़ या पावसाळ्यात तर पुरेसा चारा येईल एवढाही पाऊस न झाल्याने पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली़ त्यामुळे दुग्धोत्पादनात मोठी घट झाली व त्याचा परिणाम खवा व्यवसायावर झाला़ आजघडीला गावातील अनेक भट्ट्या विझल्या आहेत़ ज्या सुरू आहेत त्यातून अत्यल्प उत्पादन होत आहे़ >चारा-पाणीटंचाईमुळे पशुधन विकले...डोंगरशेळकीतील व्यंकटराव मरेवाड यांच्याकडे चार दुभत्या म्हशी होत्या़ परंतु, चारा व पाणीटंचाईमुळे त्यांनी दोन म्हशी विकल्या़ गणेश मुंढे यांच्याकडेही ६ जनावरे दुभती आहेत़ परंतु, टंचाईमुळे ती पुरेशी दूध देत नसल्याचे मुंढे यांनी सांगितले़ भट्टीसाठी आवश्यक असणारा दूधपुरवठा क्षमतेने होत नसल्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खवा उत्पादन घटले आहे़ अगदी १० टक्केपेक्षाही कमी खवा उत्पादित होत असल्याचे व्यवसायिक गोपीनाथ इंगळेवाड, तुळशीदास मुंढे, रामकिशन शेळके, तुकाराम मुंढे, पटन मुंढे, सुंदरबाई पवार, संतोष रोकडे, रमाकांत मुंढे यांनी सांगितले़