ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 27 - स्थानिक राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून खरेदी केलेल्या पाकीटबंद कोरड्या ‘सोया भेळ’मध्ये तळलेले चार ते पाच झुरळ आढळून आले. या घटनेने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. याबाबत संबंधित ग्राहकाने मंगळवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार करून संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. गुजरातमधील अहमदाबादेतील ‘भास्कर फूड प्रॉडक्ट्स’ने या भेळची निर्मिती केली आहे. विस्तृत माहितीनुसार, गाडगेनगरातील रहिवासी मुकुंद गणपतराव बोकडे यांनी सोमवारी सायंकाळी राधानगरातील अनंत सुपर मार्केटमधून ‘लाईट एन फिट’चे ‘सोया भेळ’चे ४५ रूपयांचे पाकीट विकत घेतले. घरी जाऊन ते पाकीट उघडले असता त्यात ५ ते ६ तळलेले झुरळ आढळून आले. झालेला प्रकार पाहून त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांना मळमळ होऊ लागली. ताबडतोब त्यांनी पुन्हा अनंत सुपर मार्केट गाठले आणि तेथील संचालकांच्या ही बाब लक्षात आणून दिली. झालेला प्रकार धक्कादायकच होता. त्यामुळे अनंत सुपर मार्केटच्या संचालकांनी ग्राहक मुकुंद बोकडे यांच्याशी चर्चा केली. सोया भेळची काही पाकिटे गुजरात राज्यातील अहमदाबादेतील कंपनीकडून बोलविल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत कंपनीकडे तक्रार केली जाईल, असेही संचालकांनी सांगितले. पश्चात मुकुंद बोकडे यांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठून झालेला प्रकार कथन केला. ‘रघुवीर’च्या कचोरीत आढळलेली अळी आणि मनभरीच्या चिवड्यात तळलेली पाल आढळल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरले होते. यामुळे तळलेले झुरळ आढळलेले भेळचे पाकीट घेऊन मुकुंद बोकडे यांनी थेट 'लोकमत' कार्यालयाशी संपर्क साधला. या प्रकरणाची तक्रार अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे करण्यात आली असून याबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘सोया भेळ’मध्ये आढळले तळलेले झुरळ
By admin | Published: December 27, 2016 8:15 PM