पुणे : हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाने दलित विद्यार्थ्यांचे केलेले निलंबन आणि त्यापैकी रोहित वेमुला याने केलेली आत्महत्या या घटनांच्या निषेधार्थ एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनच्या आठ विद्यार्थ्यांनी मंगळवारी एकदिवसीय उपोषण केले. या घटनांची स्वतंत्ररीत्या चौकशी व्हावी आणि विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव आणि केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी मुझफ्फरनगर दंगलीसंदर्भात भाष्य करणारा ‘मुझफ्फरनगर अभी बाकी है’ हा माहितीपट आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या वतीने दाखविण्यात आला होता. त्या वेळी अभाविप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या माहितीपटाचे सादरीकरण बंद पाडले होते. अभाविपचा स्थानिक कार्यकर्ता सुशीलकुमार याने फेसबुकवर आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांविरोधात बदनामीकारक मजकूर लिहिला होता. त्याचा आंबेडकर असोसिएशनने निषेध केला होता. त्यावर सुशीलकुमारने माफीही मागितली. मात्र, दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा खोटा आरोप सुशीलकुमारने केला. विद्यापीठाने चौकशी समितीमार्फत घटनेचा तपास केला. वैद्यकीय तपासणीमध्ये त्याच्या अंगावर कोणत्याच जखमा आढळल्या नाहीत, असा अहवालही विद्यापीठाकडे सादर करण्यात आला. मात्र, भाजपचे आमदार रामचंद्र राव यांनी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. पी. शर्मा यांची भेट घेतली आणि केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री बंडारू दत्तात्रेय आणि केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाने रोहितसह चार जणांना विद्यापीठासह वसतिगृहातून निलंबित केले. या विद्यार्थ्यांना कॅन्टिनसह प्रशासनाच्या आवारात जायला मज्जाव करण्यात आला. एक प्रकारे त्यांना बहिष्कृत करण्यात आले. एफटीआयआयच्या आंदोलनाशी देखील हे विद्यार्थी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय एफटीआयआय स्टुडंट असोसिएशनने घेतला असल्याचे विद्यार्थी राकेश शर्मा याने सांगितले.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण
By admin | Published: January 20, 2016 1:29 AM