ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - एफटीआयआयचे ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट) संचालक प्रशांत पाठरांबे यांनी विद्यार्थ्यांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ऐन मध्यरात्री एफटीआयआयच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करून ५ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे एफटीआयआयचा हा वाद आणखीनच चिघळला असून ऐन मध्यरात्री विद्यार्थ्यांचे अटकसत्र राबवणा-या पोलिसांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मात्र विद्यार्थ्यांनी आपल्याला अनेक तास कोंडून ठेवल्यानेच आपण पोलिसांना बोलावल्याचे सांगत पाथराबे यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले. पुनर्मुल्यांकनासाठी ५ ते ६ विद्यार्थी येणार होते मात्र सोमवारी दुपारी अचानक ४० ते ५० विद्यार्थी कार्यालयात आले आणि मला त्यांच्याशी चर्चा करावीच लागली. ती चर्चा संपल्यानंतरही विद्यार्थ्यांनी मला जाऊ दिले नाही व मला नऊ तास डांबून ठेवत शिवीगाळही केली त्यामुळे पोलिसांना बोलावण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही. संस्थेचे व संचलाकांचे नाव मलीन व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने ही कृती केल्याचे सांगत असा तमाशा करणा-यांना तुम्ही 'विद्यार्थी' कस म्हणू शकता असा सवाल पाथराबे यांनी विचारला.
सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी एफटीआयआयचे संचालक प्रशात पाठरांबे यांनी काल विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मध्यरात्री सव्वाच्या सुमारास कॅम्पसमध्ये शिरून पोलिसांनी १७ विद्यार्थ्यांपैकी ५ जणांना अटक करत त्यांना पोलीस जीपमधून डेक्कन जिमखाना पोलिस स्थानकात नेण्यात आले. या विद्यार्थ्यांवर बेकायदेशीररित्या एकत्र येणे यासह अनेक आरोप लावण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती त्यात ३ मुलींचाही समावेश आहे, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही.
ऐन मध्यरात्री केलेल्या या कारवाईबद्दल पोलिसांना जाब विचारण्यात आला असता आपण केवळ आदेशाचे पालन केल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. सोमवारपासून सुरू असलेल्या मूल्यांकन पद्धतीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या विचारणेसाठी विद्यार्थ्यांनी संचालकांना घेराव घातला होता, मात्र संचालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अटकसत्र राबवल्यामुळे संतापाचे वातावरण आहे.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत असून विद्यार्थ्यांच्या अटकेमुळे हा वाद आणखी चिघळला आहे.
विद्यार्थ्यांसाठी अरविंद केजरीवाल पुढे सरसावले
एकीकडे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली असतानाच दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू व्हावेत यासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करू देण्याची तयारी केजरीवाल यांनी दर्शवली आहे.
' एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांबाबत जे काही होत आहे, ते पाहून धक्का बसला. चुकीचे निर्णय घेऊन केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाची ही संस्था उद्धवस्त करत आहे. सरकरा जोपर्यंत विद्यार्थअयांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग घेण्यासाठी दिल्ली सरकार त्यांना जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. सरकारने जर विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकलेच नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना कायमस्वरुपू जागा देऊ' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.