पुणे : एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नसताना संचालकाच्या निवड पॅनलवर पुन्हा सदस्यपदी चौहान यांचीच वर्णी लागल्याने विद्यार्थी संघटनेने संताप व्यक्त केला आहे. महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारशी पुन्हा चर्चा करण्याची तयारी आहे; मात्र तरीही याबाबत कोणताही तोडगा न निघाल्यास या सर्व नियुक्त्यांवर स्थगिती आणण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ, असा इशारा स्टुडंट असोसिएशनने दिला आहे.हे आंदोलन दाबण्यासाठी संस्थेचे खासगीकरण किंवा ती बंद करण्याच्या धमक्या शासनपातळीवर दिल्या जात असल्याचा दावा असोसिएशनचे प्रवक्ता राकेश शुक्ला आणि रणजीत नायर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. एफटीआयआयचे संचालक डी.जे. नारायण यांची २०१४मध्ये मुदत संपली. त्यानंतर त्यांना पुन्हा एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली. संस्थेच्या नवीन संचालकाची निवड करण्यासाठी ज्या नऊ व्यक्तींच्या पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामध्ये चौहान यांचाही समावेश आहे. येत्या १३ जुलै रोजी या पदासाठी मुलाखती होणार आहेत, ज्या व्यक्तीची निवड केली जाईल, त्यालाही आमचा विरोध रहाणार असून, निर्णय अवैध मानला जाईल, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.
एफटीआयआयचे विद्यार्थी आक्रमक
By admin | Published: July 11, 2015 1:41 AM