पुणे : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आलेल्या अभिनेता गजेंद्र चौहान यांच्या विरोधात विद्यार्थी गुरुवारी पुन्हा आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या गेटसमोर बसून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना हटकताच विद्यार्थी आक्रमक झाले. परिणामी विद्यार्थ्यांना थोपविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी २३ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चौहान गुरुवारी प्रथमच एफटीआयआयमध्ये येणार असल्याने पोलिसांनी आधीच विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. तर विद्यार्थीही आक्रमक तयारीत होते. गुरुवारी तब्बल दोन वर्षांनंतर नियामक मंडळाची बैठक झाली. या बैठकीपूर्वी चौहान अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर चौहान यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने ढोल पथकाला आमंत्रित केले होते. सकाळपासूनच विद्यार्थी आक्रमक असल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.‘डाऊन डाऊन फ ॅसिझम डाऊन-डाऊन’, ‘गजेंद्र चौहान वापस जाओह्ण अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी एफटीआयआयचा परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांचा विरोध डावलून चौहान यांनी नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बैठकीला अपर सचिव व आर्थिक सल्लागार डॉ. सुभाष शर्मा, चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी, निर्माता-दिग्दर्शक बी. पी. सिंग, चित्रपट कलाकार सतीश शाह,राहुल सोलापूरकर, संयुक्त सचिव (चित्रपट) संजय मूर्ती, अनघाघैसास, नरेंद्र पाठक, चित्रपट समीक्षक भावना सोमय्या, ऊर्मिल थाप्लीयाल, प्रांजल सायकिया, फिल्म्स डिव्हिजनचे महानिदेशक मुकेश शर्मा, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे विशेष अधिकारी चैतन्य प्रसाद, चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रवण कुमार, सत्यजित रे चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे संचालकसंजय पटनायक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांचे पुन्हा महाभारत
By admin | Published: January 08, 2016 3:44 AM