नागपूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल-डिझेल आणि गॅसची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन वितरणाचा कार्यक्रम कस्तूरचंद पार्कवर शुक्रवारी पार पडला. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, खा. अजय संचेती, एलपीजीचे अजित सिंग आणि आयओसीएलचे वाय.के. गुप्ता उपस्थित होते.देशात पाच लाख महिलांचा मृत्यू घरगुती प्रदूषण आणि प्रदूषणकारी इंधनाने होतो. आकडेवारीनुसार घरात एक तास होणारा धूर ४०० सिगारेटच्या धुराएवढा घातक असतो. मे महिन्यात बलिया येथून पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत ४.५० लाख महिलांना एलपीजी कनेक्शन दिले आहे. सर्वांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. ग्रामीण भागात गॅस वितरक नेमण्यात येतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ज्या कुटुंबांची नावे सुटली आहेत त्यांचा समावेश करण्याचे आश्वासन प्रधान यांनी दिले. (प्रतिनिधी)
'समृद्धी'वर इंधन पाइपलाइन
By admin | Published: December 24, 2016 4:38 AM