ठाणे : ठाणे परिवहनसेवेचे तिकीट दर आता डिझेलच्या वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या किमतीवर ठरविले जाणार आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्यास तिकीट दर कमी आणि वाढल्यास तिकीट दरही वाढणार आहेत. त्यानुसार जानेवारी अथवा जूनमध्ये ते निश्चित करण्यात येणार आहेत. ठाणे परिवहन सेवेत सध्या जेएनएनयूआरएम अंतर्गत २०० बस टप्याटप्याने समाविष्ट केल्या जात आहेत. त्या खरेदी करण्यासाठी २००९ मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार ५६.८० कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. केंद्र शासनाने बसेस खरेदीसाठी अनुदान मंजूर करतांना सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या संस्थांचे सक्षमीकरण व प्रवाशांना प्रभावी बससेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोणातून काही सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सुचनांनुसार सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या संस्थांचे तिकीट दर नियमित करण्याची कार्यप्रणाली अंमलात आणण्याचे सांगण्यात आले होते.या संदर्भात महापालिकेने मे. अर्बन मास ट्रान्झीट कंपनी (यूएमटीए) यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) कार्यक्षेत्रासाठी अशा प्रकारची कार्यप्रणाली अंमलात आणणे हे परिवहन उपक्रम व प्रवासी यांनी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार डिझेल दरवाढ अथवा घट, कन्झ्युमर इंडेक्स व वार्षिक देखभाल दुरुस्ती विचारात घेऊन प्रवासी भाडेवाढी दराबाबत सूत्र तयार केले आहे. या सूत्रानुसार दरवर्षी १ जानेवारी व १ जून रोजी भाडेवाढ अथवा घट निश्चित होणार आहे. (प्रतिनिधी)>प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा विश्वासयाची अंमलबजावणी ही प्रशासनाकडून करण्यात येईल. या नव्या सूत्रानुसार तिकीट दर करताना निश्चित तारखेस दर वाढ - घट ही खर्चाच्या प्रमाणात राहणार आहे, डिझेलची दरवाढ झाल्याने होणारा तोटा कमी होण्यास मदत होईल, वार्षिक देखभाल दुरुस्तीचे दर गृहीत धरल्याने वाहन दुरुस्ती चांगली होऊन प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, उपक्रमाला नियमित सेवा सर्वत्र क्षेत्रात उपलब्ध करुन देण्यास वाव मिळेल.
डिझेलच्या दरानुसार टीएमटीची भाडेवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 4:02 AM