मुंबई : वादग्रस्त आदर्श सोसायटीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांवरील निर्णय बुधवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला. अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या सोसायटीवर आहे, तसेच यामध्ये काही राजकीय नेत्यांची नावेदेखील चर्चेत आहेत.आदर्श सोसायटीविरुद्ध असलेल्या इतर याचिकांबरोबरच ही सोसायटी पाडण्याच्या आदेशाविरुद्ध खुद्द सोसायटीने केलेल्या याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी घेण्यास सुरुवात केली. सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवत आहोत, असे बुधवारी स्पष्ट केले.आदर्श सोसायटीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने या विरुद्ध अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. आदर्श सोसायटीने पर्यावरण व वन मंत्रालयाकडून आवश्यक ती परवानगी घेतली नसल्याचे व अन्य महत्त्वाच्या परवानगी घेतल्या नसल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, तर आदर्श सोसायटीने एमओईएफने इमारत तोडण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. जे. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची नियुक्तीही केली होती. या आयोगानेही सोसायटीला बेकायदेशीररीत्या परवानगी देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
‘आदर्श’संबंधी सुनावणी पूर्ण
By admin | Published: December 03, 2015 1:24 AM