पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाला अखेर दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुर्णवेळ कुलसचिव मिळाले आहेत. प्रभारी कुलसचिव आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांचीच कुलसचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच वित्त व लेखा अधिकारीपदी सनदी लेखापाल अतुल पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव पद दीड वर्षांपासून रिक्त होते. तत्कालीन कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर काही महिने विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे कुलसचिव पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. तर काही दिवसांपुर्वीच डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यामुळे सुमारे दीड वर्ष विद्यापीठ पुर्णवेळ कुलसचिवांविना होते. या पदासाठी नुकत्याच १६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. अखेर निवड समितीने सोमवारी (दि. १२) या पदासाठी पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.वित्त व लेखा अधिकारी पदी सनदी लेखापाल अतुल पाटणकर यांची वर्णी लागली आहे. डॉ. विद्या गारगोटे यांचा कार्यकाळ संपल्याने या पदासाठीची निवड प्रक्रियाही सुरू होती. पाटणकर यांना या क्षेत्रातील २० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातील वाणिज्य शाखा व सनदी लेखापालाची पदवी मिळविली आहे. दरम्यान, कुलसचिव पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सिनेट सदस्य राजेश पांडे, व्हि. बी. गायकवाड, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांच्या निवड समितीने या मुलाखती घेतल्या. डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह डॉ. अजय दरेकर, श्रीरंग बाठे, प्राचार्य भारत जिंतूरकर आदी उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. कुलसचिवपदासाठी एकूण ४० अर्ज आले होते, त्यापैकी १२ जणांचे अर्ज अपात्र ठरले होते. उर्वरीत उमेदवारांपैकी केवळ १६ जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या.
दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 9:02 PM
विद्यापीठाचे कुलसचिव पद दीड वर्षांपासून रिक्त होते.
ठळक मुद्देकुलसचिवपदासाठी एकूण ४० अर्ज त्यापैकी १२ जणांचे अर्ज अपात्र