जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. २८ - आपल्या मित्राबरोबर पतीनेच रंगेहाथ घरात पकडल्यानंतर पुन्हा पतीवरच छळवणूकीची तक्रार दाखल करण्याची धमकी देत घरात चोरी करणाऱ्या एका विवाहितेसह तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने कासारवडवली पोलिसांना दिले आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीला हा दखलपात्र गुन्हा नसल्याचे सांगत पोलिसांनीही त्याची बोळवण केली होती. ठाण्याच्या कासारवडवली भागात राहणाऱ्या प्रियंका (३०) आणि शैलेश(३४) यांचा २०१२ मध्ये विवाह झाला. ती एका कॉलसेंटरमध्ये तर तिचे पती आंतरराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक आहे. तिची त्याच कॉलसेंटरमधील उमेश (३२) या (सर्व नावे काल्पनिक आहेत) मित्राशी चांगलीच ‘जवळीक’ निर्माण झाली. कामानिमित्त नेहमी बाहेर असणाऱ्या तिच्या पतीला याची काहीशी कुणकणही लागली. पण, त्याने तिच्याशी या विषयावर थेट न बोलता केवळ ‘नजर’ ठेवली. २५ मे २०१७ रोजी तिने पतीला कुठे आहात अशी विचारणा केली? तेंव्हा त्याने आपण काही कामानिमित्त बाहेर असून घरी यायला थोडा उशिर होणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात, तो घरातच अडगळीच्या ठिकाणी लपून बसला होता. हीच संधी साधून तिने उमेशला घरी बोलविले. दोघांमध्ये गप्पा रंगल्यानंतर त्यांना कसलेच भान राहिले नाही. त्याचवेळी तिच्या पतीने मात्र दोघांनाही नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले. पकडले गेल्यानंतर सुरुवातीला पतीकडे याचना करीत माफी मागून तिने सहानुभूती मिळविली. परंतू, तिसऱ्याच दिवशी २७ मे रोजी तिने घर सोडले. जातांना घरातून सोन्याचे दागिने आणि काही मौल्यवान वस्तूही नेल्या. ज्या फोनमध्ये पतीने तिचे ‘चाळे’ चित्रीत केले होते. तो फोनही तोडला. त्यानंतर मात्र तिने पवित्रा बदलत आपल्या मित्राच्या मदतीने पतीलाच हुंडयासाठी शारीरीक आणि मानसिक छळवणूक केल्याचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिली. यामध्ये ८१ वर्षीय सासरे आणि ७० वर्षीय सासू तसेच भाऊ आणि बहिण या सर्वांनाच गुंतविण्याचीही तिने धमकी दिली. त्याच नावाखाली तिने पतीकडून काही पैसेही उकळले. या सर्व प्रकाराची पिडीत पतीने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे सांगून त्याची बोळवण केली. अखेर सिद्धविद्या या महिला वकीलाच्या मदतीने त्यांनी ठाणे न्ययालयात याचिका दाखल केली. गेल्या एक महिन्याच्या पाठपुराव्यानंतर ठाणे न्यायालयाने २३ जून रोजी याप्रकरणी कलम १५६ (३) नुसार सखोल चौकशीचेही आदेश दिले. तसेच कासारवडवली पोलिसांना संबंधित महिलेच्या मित्राविरुद्ध खंडणीसाठी धमकावणे, बेकायदेशीर घरात घुसणे, पर स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवणे आदी कलमांखाली गुन्हा नोंदविण्याचे तर घरात चोरी करणे तसेच गैरपुरुषाला मदत करणे, पतीला धमकावणे, खंडणी मागणे आदी कलमांखाली तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ‘‘ ज्या पिडीत आणि शोषित महिलांसाठी कायदे आहेत. त्या अशा कायद्यापासून वंचित राहतात. त्यांना त्याची माहितीही मिळत नाही. किंवा त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धैर्य दाखवत नाही. पण अशा कायद्यांचे हत्यार बनवून त्याचा गैरफायदा घेणाऱ्या प्रियंका सारख्या महिलांवरही कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे. तिच्या पतीसारख्या पिडीत पुरुषांनाही न्याय मिळणे आवश्यक आहे.’’ अॅड. सिद्धविद्या, ठाणे.
मित्रासोबत करत होती मौजमजा! पकडल्यावर पतीलाच दिली धमकी
By admin | Published: June 28, 2017 10:49 PM