...हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संशोधनाचा विषय; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:25 PM2023-07-24T12:25:44+5:302023-07-24T12:26:12+5:30
गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत त्यावरूनही राऊतांनी भाजपावर टीका केली.
मुंबई – माझ्या हातात तिजोरी आहे म्हणून लुटायची याला लुटमार म्हणतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा कुरबुरी होत होत्या. मविआ सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री होते, तेव्हाही निधी वाटपाबाबत कुरबुरी होत्या. माझ्यासोबत २५-४० आमदार आहेत मी त्यांचेच खिशात भरघोस निधी देईन. हा निधीवाटपातील असमतोल महाराष्ट्रातील राजकारण नासवणारे आणि खराब करणारे आहे. आमचे रवींद्र वायकर या विषयावर न्यायालयात गेलेत. निधीवाटपात कोट्यवधीचा अपहार आहे अशा शब्दात निधीवाटपावरून संजय राऊतांनीअजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांना निधी दिला जात नाही. जयंत पाटलांना दिला जातो, महाराष्ट्रातील राजकारणातील निधीवाटप संशोधनाचा विषय आहे. राज्यातील निधीवाटपावर संशोधन करायला हवे. ज्यांनी पक्षांतरे केली मग ती शिवसेनेची असतील वा राष्ट्रवादीचे त्यांनी एका भीतीपोटी पक्षांतर केलेत. ज्यांचा एक पाय तुरुंगात होता ते सत्तेत सहभागी झाले आहेत. भरत गोगावलेंना १५० कोटी निधी दिल्याचे ऐकले, हा आकडा आश्चर्यचकीत करणारा आहे. कुणाला तरी मंत्रिपद दिले नाही म्हणून त्यांना शांत करण्यासाठी तुम्ही हा निधी देताय का? असा सवालही राऊतांनी विचारला.
राऊतांचा भाजपावर निशाणा
गेल्या काही दिवसापासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंकडे यांच्याकडे मुख्यमंत्री होण्यासाठी कुठे बहुमताचा आकडा होता. मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ चा आकडा लागतो. अजित पवार मुख्यमंत्री स्वत: होणार नाही तर त्यांना कुणीतरी करणार आहे. ज्यांच्याकडे आकडा आहे मुख्यमंत्री होण्याचा ते स्वत: मुख्यमंत्री होत नाहीत आणि ते दुसऱ्यांवर आकडा लावतात असं म्हणत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.