नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले असून सामाजिक समीकरणाचे संतुलन कायम राहावे यासाठी पक्षातील बहुजन नेतृत्वालासुद्धा नव्या सत्तेत सन्मान देण्यात यावा, असा विचार भाजपाश्रेष्ठी अत्यंत गांभीर्याने करीत आहे. पश्चिम विदर्भातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. संघपरिवाराने या आशयाच्या सूचना भाजपा नेत्यांना दिल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात पश्चिम विदर्भातील ज्येष्ठ नेते फुंडकर हे बहुजन समाजातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. फुंडकर हे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. मुंडे यांच्या निधनानंतर मध्यंतरी ते काहीसे एकाकी पडले होते. अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत मुलगा आकाश याला निवडून आणीत त्यांनी पक्षातील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.दोन वर्षांपूूर्वी फुंडकरांकडून विरोधी पक्षनेते पद काढून घेतल्यावर कुठेही नाराजीची प्रक्रिया न देता त्यांनी पक्ष कार्यात वाहून घेतले. मुंडे यांच्या निधनानंतर फुंडकर यांनी बहुजन समाजाला एकसंघ ठेवण्याचाच प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे राहात त्यांच्या संघर्ष यात्रेचाही प्रांरभ बुलडाण्यातूनच शानदारपणे होईल व बहुजन समाजात योग्य संदेश जाईल याची काळजी त्यांनी घेतली. या सर्व बाबींची चर्चा आता दिल्लीच्या वर्तुळात आहे. भाजपातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात यावेळी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. प्रथमच हा समाज मोठ्या प्रमाणावर भाजपाकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. या समाजाच्या मनात पक्षाबद्दल निर्माण झालेला विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींवर आहे. या यशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा मोठा फायदा झाला असला तरी भविष्यात प्रत्येकवेळी अशीच लाट राहील, असे नाही. आधीच आमच्या पक्षाला ‘भट-ब्राह्मणांचा’ पक्ष म्हणून बदनाम केले जाते अशावेळी बहुजन समाजात आश्वासक संदेश पोहोचविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
फुंडकरांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार
By admin | Published: October 23, 2014 3:33 AM