ऑनलाइन लोकमतनांदगाव खंडेश्वर, दि. २० : ‘अमर रहे...अमर रहे..शहीद विकास अमर रहे..’ चे गगनभेदी नारे आणि जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत वातावरणात शासकीय इतमामात शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे धाकटे बंधू मयूर उईके यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी शहीद विकासच्या माता-पित्यांसह भावंडांच्या प्रचंड वेदनादायी आक्रोशाने अख्खे नांदगाव गहिवरले होते.
सोमवारी सकाळीच जम्मू-काश्मिरनजीक उरी येथील सैन्यतळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात नांदगावचा पूत्र विकास ऊर्फ पंजाब उईके वीरगतीला प्राप्त झाल्याचे वृत्त नांदगावात धडकले होते. तेव्हापासूनच उईके यांच्या घरासमोर आणि गावांतील गल्लीबोळात गर्दी जमू लागली होती. कुटुंबीयांचा आक्रोश तर अविरत सुरूच होता. आई बेबीताई, वडील जानराव, बहीण प्रीती आणि भाऊ मयूर सर्वस्व हरवल्यागत शून्यात नजर लावून बसले होते. सायंकाळी पार्थिव नांदगावात पोहोचणार असल्याची माहिती मिळाल्याने गावकरीदेखील डोळ्यांत प्राण आणून लाडक्या विकासच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शहीद विकासच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली.
मंगळवारी पहाटेपासूनच जिल्ह्यासह तालुक्यातील गावागावांतून लोकांनी अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावली होती. सकाळपासूनच ‘अमर रहे..शहीद विकास अमर रहे..’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘निम का पत्ता कडवा है..पाकिस्तान ... है’ अशा नाऱ्यांनी आसमंत दणाणला होता. भगिनींनी गावातील रस्ते स्वच्छ करून सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. कित्येक ठिकाणी फुलांची आरासही करण्यात आली होती.
दुपारी १२.४५ मिनिटांनी शहीद विकासचे पार्थिव लष्कराच्या ताफ्यासह नांदगावात पोहोचले. आपल्या काळजाच्या तुकड्याचे तिरंग्यात लपेटून आलेले पार्थिव पाहताच आईने हंबरडा फोडला. वडिलांनीही आतापर्यंत थोपवून धरलेल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. फुलांनी सजविलेल्या रथातून शहीद विकासची अंत्ययात्रा गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. रस्त्यावर ठिकठिकाणी शहीद विकासला अंतिम नमन केले. पश्चात शहीद विकासचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सुसज्ज केलेल्या लाखाणी ले-आऊटमध्ये नेण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्यावतीने तेथे शहीद विकासला मानवंदना देण्यात आली. २० शिपाई व एका अधिकाऱ्यासह २१ जणांनी यावेळी शहीद विकासला ६० राऊंड फायर करून सलामी दिली. पश्चात विकासचा लहान भाऊ मयूर याने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.
यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, आ. बच्चू कडू, आ. अनिल बोंडे, आ.वीरेंद्र जगताप, आ.आशिष देशमुख, अरूण अडसड, माजी आमदार सुलभाताई खोडके, निवेदिता चौधरी, अभिजित ढेपे, नगराध्यक्ष अक्षय पारस्कर, संजय बंड, बाळा भागवत, दिनेश सूर्यवंशी, नीलेश विश्वकर्मा, सुनील वऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक अरूण राऊत, बाजार समितीचे सभापती विलास चोपडे, पंचायत समिती सभापती शोभा इंगोले यांच्यासह पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.