लोणंद (जि. सातारा) : अरुणाचल प्रदेशात ड्युटीवर असताना तंबूने पेट घेतल्यामुळे वीरमरण आलेले कराडवाडी येथील जवान सुभाष लालासाहेब कराडे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी सांजोबाचा माळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.सुभाष कराडे (वय ३५) हे भारतीय सैन्य दलामध्ये इंजिनियरिंग युनिट १२०, बिग्रेड ४६ मध्ये हवालदार होते. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर टेंगा या सात हजार फूट उंचीवरील डोंगराळ भागात देशसेवा बजावत होते. ३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ऊब देणाºया शेगडीचा भडका होऊन लागलेल्या भीषण आगीत कराडे गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.पार्थिव सकाळी नऊ वाजता कराडवाडी येथे आणण्यात आले. फुलांनी सजविलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. भाऊ संजय, मुलगा सनी यांनी मुखाग्नी दिला. यावेळी सातारचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, वाई-खंडाळाचे आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील,आदी उपस्थित होते.
जवान सुभाष कराडेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 5:32 AM