पालघर :
दांडाखाडी गाव परिसरातील पारंपरिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व त्या भागातील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊनही ते हटविण्यात ग्रामपंचायत चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ आशिष बारी (५०) यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार केले.
केळवे गावाच्या दक्षिणेला असलेल्या दांडाखटाळी गावातील सर्व्हे नं. ३ या सरकारी जमिनीवरील २० गुंठे जागेवरील बेकायदा बांधलेले कंपाऊंड पाडावे, पाण्याचा नैसर्गिक ओहोळ खुला करावा आणि स्मशानभूमी खुली करावी, अशी तक्रार ग्रामस्थ रामचंद्र दांडेकर यांनी पंतप्रधान आणि महसूल विभागाकडे २१ डिसेंबर २०२१ रोजी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सुनील शिंदे यांनी ७ जुलै रोजी सुनावणी घेतली होती. या सुनावणीत तक्रारदारांनी झालेला अतिक्रमणाबाबतचा पुरावा निदर्शनास आणून दिला होता. त्यामुळे हे अतिक्रमण दूर करावे, असे आदेश तहसीलदारांनी ग्रामसेवकाला पत्र पाठवून दिले होते.