ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर/चंदगड, दि. ८ - जम्मू-काश्मीरच्या पूँछ येथे पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात शहीद झालेले जवान राजेंद्र तुपारे अनंतात विलीन झाले. चंदगड तालुक्यातील कारवे गावात मंगळवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तुपारे यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे १५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
सोमवारी सायंकाळी हवाई दलाच्या खास विमानाने तुपारे यांचे पार्थिव बेळगाव येथे आणण्यात आले. आज सकाळी कार्वे या त्यांच्या मूळ गावी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी गावक-यांसह पंचक्रोशीतील नागरिकही उपस्थित होते. लष्कराने त्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव अनंतात विलिन झाले.