ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 30 - जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडाजवळील माछील सेक्टर येथे शहीद झालेले दुधगाव (ता. मिरज) येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अकरा वाजता दुधगाव येथे वारणा नदीकाठी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी ग्रामस्थांतर्फे अंत्ययात्रा काढली जाणार आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजूस मानवी साखळी केली जाणार आहे.सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी हे शुक्रवारी रात्री शहीद झाले. त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त समजताच दुधगावमध्ये शोककळा पसरली. ग्रामस्थांनी शोकसभा घेऊन, दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन, सोमवारपर्यंत दुखवटा पाळला आहे. रविवारी कवठेपिरान, सावळवाडी व माळवाडी या तीन गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत अंत्यसंस्काराच्या तयारीबाबत चर्चा झाली. अंत्यसंस्कारासाठी येणाºया नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था सांगली रोड, दत्त मंदिर, आष्टा-बागणी रोड व वारणा नदीकाठी करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजता नितीन कोळी यांचे पार्थिव इस्लामपुरात येणार आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता तेथून सीमा सुरक्षा दलाचे पथक पार्थिव घेऊन निघणार आहेत. त्यांच्यासोबत सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी रणजितसिंह सूर्यवंशी आहेत. सकाळी सात वाजता पार्थिव नितीन कोळी यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव कर्मवीर भाऊराव पाटील चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तिथून सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढली जाणार आहे. कर्मवीर चौक, चावडी कार्यालय, काझी गल्ली, अरिहंत कॉलनी या मार्गावरुन अंत्ययात्रा दुधेश्वर मंदिरमार्गे वारणा नदीकाठी पोहोचणार आहे.सकाळी अकरा वाजता लष्करी इतमातात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.