मुंबई : रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट येथे लागलेल्या आगीत तब्बल ६०हून अधिक गाळे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. या घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. कोट्यवधींच्या मालाचे नुकसान झाल्याचा अंदाज गाळेधारकांसह व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. आग आणखी पसरू नये, मनुष्यहानी टळावी, यासाठी सर्वच नियंत्रण कक्षांसह रुग्णालयातील अपघात विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने दुर्घटनेवेळी दिल्या होत्या. क्रॉफर्ड मार्केटला यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या आहेत. वित्तहानीही अनेकदा झाली आहे. मुळात या मार्केटमध्ये चिंचोळ्या गल्ल्या आहेत. येथील गाळे दाटीवाटीने वसलेले आहेत. शिवाय गाळ्यांलगत अडगळही मोठ्या प्रमाणात पडून असते. महापालिकेने गाळेधारकांसह येथील समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे गाळेधारकांनीही महापालिका प्रशासनाला न जुमानता अग्नी प्रतिबंधाचे सगळे नियम धाब्यावर बसविले आहेत; आणि त्याचा फटकाही यापूर्वी गाळेधारकांसह व्यापाऱ्यांना अनेकदा बसला आहे. रविवारीही क्रॉफर्ड मार्केटमध्ये अग्निडोंब उसळला आणि व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. (प्रतिनिधी)
क्रॉफर्ड मार्केटला भीषण आग
By admin | Published: October 26, 2015 2:57 AM