ऑनलाइन लोकमतचाकण, दि. 30 - "स्पर्धा, प्रदूषण व बदलत्या जीवनशैली यामुळे निरोगी व आनंदी जीवन जगणे मोठी तारेवरची कसरत झाली असून, अनेक जण नकळतपणे आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे, मात्र ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे. त्याकरिता प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे ", असे विचार सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर कोठारी यांनी येथे व्यक्त केले.धृवशेठ कानपिळे मित्र परिवार व चाकण हार्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मीरा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य व्याख्यानमालेत " मेंदू विकार व आधुनिक उपचार पद्धती " या विषयावर अखेरचे पुष्प गुंफून मार्गदर्शन करताना डॉ. कोठारी बोलत होते. यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुजाताई कड, चाकण हार्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील शहा, उद्योगपती धृवशेठ कानपिळे, सचिव डॉ. रावसहेब आवटे, उद्योजक साहेबराव कड, रोहिणी कानपिळे, शोभा शहा, वर्षा शहा, अनुजा वाव्हळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत शेवकरी, विजय काकडे, कीर्तिकुमार शहा, जयवंत रामाणे, आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवर, ग्रामस्थ व चाकण हार्ट फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या तीन दिवसापासून येथे सुरू असलेल्या या आरोग्य व्याख्यानमालेचा शुभारंभ खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी शेलपिंपळगाव येथील संपर्क बालग्रामचे व्यवस्थापक अमल गांगुली यांना आमदार गोरे यांच्या हस्ते चाकण हार्ट फाऊंडेशनचा समाजिक गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व गौरवपुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शिंदे यांनी ' त्वचा विकार व आधुनिक लेझर उपचार पद्धती ' या विषयावर मार्गदर्शन करून पहिले पुष्प गुंफले. तर कान, नाक, घसा, तज्ञ डॉ. मुबारक खान यांनी ' कान नाक घसा, निदान व आधुनिक उपचार पद्धती,' या विषयावर मार्गदर्शन करून दुसरे पुष्प गुंफले. चाकण हार्ट फाऊंडेशन व धृवशेठ कानपिळे मित्र परिवाराने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून, अखेरचे पुष्प गुंफताना डॉ. कोठारी म्हणाले," जीवा शिवाला चिरंतन काळ ज्ञानाचा ठेवा देणारी चाकणची ही आरोग्य व्याख्यानमाला अखंडपणे तेवत राहिली पाहिजे. समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याकरिता अशा व्याख्यानमालांची नितांत गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज असून, भविष्यातील चढउतार सांभाळण्यासाठी व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे ". येथील महिला कार्यकर्त्या ( स्व.) सविता रामाणे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जयवंत रामाणे यांनी चाकण हार्ट फाऊंडेशनला रोख अकरा हजार रुपयांची देणगी दिली. आमदार सुरेश गोरे, नगराध्यक्षा पूजा कड आदींनी या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमासाठी भविष्यकाळात लागणारे सर्व सहकार्य केले जाईल, असे अभिवचन दिले. चाकण हार्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील शहा यांनी प्रास्ताविक केले. रोहिणी कानपिळे, वर्षा शहा व शोभा शहा यांनी स्वागत केले. कीर्तिकुमार शहा यांनी सूत्रसंचालन केले. उद्योगपती धृवशेठ कानपिळे यांनी सर्वांचे आभार मानले.
आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही भविष्यातील धोक्याची घंटा - डॉ. सुधीर कोठारी
By admin | Published: January 30, 2017 7:01 PM