यदु जोशी -
मुंबई : भावी खासदार म्हणून कोणी पोस्टर लावण्याच्या भानगडीत पडू नका, काहीजण तसे करत आहेत; पण तसे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो. पक्ष समजतो त्यांना हे सांगण्याची गरज नाही, या शब्दात अतिउत्साही इच्छुकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पक्षाच्या बैठकीतच दणका दिला.
प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, महाविजय अभियानाचे विभागीय संयोजक, लोकसभा मतदारसंघ संयोजक, विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांची बैठक दादरमधील पक्ष कार्यालयात झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. काहीजण तसे पोस्टर लावत असल्याचे कानावर येत आहे. ज्यांना भाजप कळतो त्यांना तसे केल्याने काय होते हे चांगलेच ठाऊक आहे. तिकीट कोणाला मिळणार हे पक्षाचे संसदीय मंडळ, ज्येष्ठ नेते ठरविणार आहेत. त्यात डोके लावू नका. सामान्य, गरीब माणसाशी कनेक्ट ठेवा, तीच आपली कोणत्याही सर्वेक्षणात न येणारी व्होटबँक आहे, असे खडे बोलही फडणवीस यांनी सुनावले.
आपला विजय पक्का; पण म्हणून प्रयत्न सोडू नका. कुणाला तिकीट मिळणार, कुणाला नाही, याची चिंता तुम्ही करू नका. केंद्र आणि राज्य सरकारने प्रचंड विकासकामे केली, जनकल्याणाच्या योजना आणल्या, ही कामगिरी प्रत्येकापर्यंत पोहोचवा. जातीपातीपलीकडे मोदींची व्होट बँक आहे, हे समजून पुढे चला.
निवडणूक ही थंड डोक्याने लढवायची असते. तुम्हाला कोणत्या गोष्टीवर वैताग आला असेल तर तो पक्षात मांडा, पक्षाबाहेर बोलू नका. वाचाळवीरांना आवरावेच लागेल. सर्वांचे वहीखाते पक्षाकडे आहे, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी दिल्या.
साधेपणा ठेवा, अवडंबर नकोपक्षाचे मेळावे, कार्यक्रम होतील. तिथे कोणताही झगमगाट नको. श्रीमंतीचे प्रदर्शन बिलकूल करू नका. जेवणात पदार्थांची रेलचेल वगैरे अजिबात चालणार नाही, असे फडणवीस आणि बावनकुळे यांनी बैठकीत बजावून सांगितले. पक्षाचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनीही कानपिचक्या दिल्या.
तीन पक्षांचे तीळगूळ मेळावे राज्यभर होणारप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले, की महायुतीतील तिन्ही पक्षांचे सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आणि सहा विभागीय असे मेळावे होतील. विभागीय मेळाव्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करतील. महायुतीत गोडवा निर्माण करत विजयाचा निर्धार करणे हे मेळाव्यांचे लक्ष्य असेल.
शाह, राजनाथ सिंह, नड्डा अन् गडकरींचे लक्षराज्यात १२ लोकसभा मतदारसंघांचे एक क्लस्टर भाजप करणार आहे. एकेका क्लस्टरची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे असेल. ते आपापल्या क्लस्टरच्या बैठका, आढावे सातत्याने घेतील, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.