सुनील काकडे
वाशिम, दि. २१ : चोहोबाजूंनी वेढलेली घरे, सदोदित साचणारी घाण यामुळे शहरातील माहुरवेस परिसरात असलेल्या इटाळी नावाच्या तलावाचे भवितव्य धोक्यात सापडले आहे. प्रशासनाने या जलस्त्रोताचे रक्षण केल्यास परिसरातील पाणीपातळी वाढून जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता येणे शक्य आहे.माहुरवेस परिसरातील जुन्याजाणत्या नागरिकांशी या तलावासंदर्भात चर्चा केली असता त्यांनी सांगितले, की तलावामध्ये कधीकाळी स्वच्छ पाणी साठवून राहायचे. मात्र, साधारणत: ४० वर्षांपूर्वी एका महिलेने मासिक पाळीदरम्यान या तलावात आपले कपडे धुतले, तेव्हापासून या तलावाला इटाळी तलाव असे नाव पडल्याची माहिती चर्चेतून समोर आली. सद्य:स्थितीत या तलावात साचणाऱ्या घाण पाण्यामुळे परिसरात वास्तव्य करणाऱ्या रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात सापडले असून सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. नगर परिषद प्रशासनाने तलावाची स्वच्छता करून उद्भवलेली समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.