डिप्पी वांकाणी, मुंबईमुंबईतील एका मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांचे भवितव्य आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. मॉडेलने दिलेल्या तक्रारीनंतर आॅगस्टमध्ये त्यांच्याविरुद्ध पोलीस सहआयुक्त (प्रशासन) विवेक फणसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक तपास करण्यात आला. त्यांनी मॉडेलला पाठवलेले हजारहून अधिक एसएमएस आणि अन्य पुरावे पोलिसांकडे आहेत. त्याचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांना आपण सादर केला असून, चौकशीत पारसकर व्यावसायिक गैरवर्तणूक केल्याचे आढळून आले, असे फणसाळकर यांनी सांगितले. पारसकर यांच्याविरुद्ध आता शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. नियमानुसार सचिव पातळीवरील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली त्यांच्यासंबंधी चौकशी केली जाऊन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले जाईल. त्यावर काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्रीच ठरवतील. आरोपपत्रासोबत पुरावेही जोडले जातील. त्यात हजारभर एसएमएस, फोन कॉल रेकॉर्ड्स, जाबजबाब, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आदींचा समावेश असेल. अनेकांनी त्यांना कार्यालयीन वेळेत मॉडेलसोबत फिरताना पाहिले आहे. पारसकर यांना आता आरोप स्वीकारणे किंवा त्यांचा प्रतिवाद करणे, असे पर्याय उपलब्ध आहेत. एका मॉडेलसोबत त्यांचे नेमके काय संबंध होते, इतके एसएमएस का दिले-घेतले, अशा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
सुनील पारसकरांचे भवितव्य आता मुख्यमंत्र्यांच्या हाती
By admin | Published: November 06, 2014 4:11 AM