मनोहर कुंभेजकर, मुंबईअंधेरी (प़) येथील अंधेरीच्या राजासाठी तब्बल ८,५०० किलो वजनाचा आणि सुमारे १० फूट लांब असलेला जगातील सर्वात महाकाय बेसन लाडू बनवण्यात येत आहे. येत्या २२ सप्टेंबरला अंधेरीच्या राजाच्या चरणी हा महाकाय लाडू अर्पण करण्यात येईल. गेले आठ-दहा दिवस मुंबईतील सुमारे ५० कारागीर हा लाडू तयार करण्यात मग्न आहेत. या लाडूची जगातील सर्वात मोठा बेसनाचा लाडू म्हणून विक्रमी नोंद होणार असल्याची माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली. यंदा अंधेरीचा राजा गुजरात येथील प्रसिद्ध अंबाजी मातेच्या मंदिरात विसावला आहे. अंधेरीच्या राजाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक धर्मेश शहा यांच्या संकल्पनेतून सुमारे २५० कलाकारांनी गेली दोन महिने अहोरात्र काम करून अंबाजी मातेच्या मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला आहे. जागतिक कीर्तीचे फॅशन डिझायनर साईसुमन यांनी सलग १६ दिवस कष्ट करून राजासाठी खास शाल आणि धोतर तयार केले आहे. परळ रेल्वे वर्कशॉपमधील प्रसिद्ध मूर्तिकार राजन खातू यांनी ८.५ फुटांची अंधेरीच्या राजाची सुंदर मूर्ती बनवली आहे. पहिल्या दिवसापासून भक्तांची रीघ अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी लागली आहे. भक्तांनी दिलेल्या सुवर्णदानातून सुमारे १.२५ कोटींचा हिरेजडित सुवर्णमुकुट राजाच्या डोक्यावर विराजमान झाला आहे. सध्याच्या इंटरनेटच्या युगात येथील मंडप परिसरात फोरजी वायफाय कनेक्शनची सुविधादेखील गणेशभक्तांना पुरवण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष केशव तोंडवलकर आणि खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली.
अंधेरीत तयार होतोय महाकाय लाडू
By admin | Published: September 21, 2015 2:36 AM