जयंत धुळप, अलिबागइ.स. ६०० ते ७०० मधील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील किल्ले रतनगड, सोनगिरी, महलमिऱ्या, माणिकगड, सागरगड या गडांचे जतन व संरक्षणासाठी तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना पर्यटन केंद्रे म्हणून विकसित करण्यासाठी ७० ते ८० गावांतील तरुण सरसावले आहेत. याशिवाय ग्रामस्थानां उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना पेण तालुक्यात गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन, कोकण या संस्थेच्या तब्बल १०० तरुणांनी गेल्या वर्षीपासून हाती घेतली आहे.संस्थेच्या स्थापनेपासूनच पुरातन वस्तू, वास्तू, किल्ले, गड याच्या देखभालीसाठी स्थानिकांना सहकार्य करण्याचे काम सुरू होते. पेण तालुक्याचा सखोल अभ्यास गेली सात-आठ वर्षे करून विविध माध्यमांतून अधिकृत माहिती व ऐतिहासिक पुराव्यांचे सकलन करण्याचे काम केले. त्याच वेळी गडभ्रमंतीच्या निमित्ताने गडकोट स्वच्छतेचे काम निसर्गच्या शिलेदारांनी केले. त्यातूनच त्यांच्या संवर्धनाची आणि स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीची संकल्पना पुढे आल्याचे निसर्ग फ्रेंडशिप असोसिएशन, कोकण संस्थेचे अध्यक्ष योगेश शशिकांत म्हात्रे यांनी सांगीतले.सन ६00 सालापासूनचे व काही त्यापूर्वीचे ठळक पुरातन अवशेष, वास्तू, वस्तू व ठिकाणे दिसून येत आहेत. त्याचे महत्त्व लक्षात घेऊ नच रीतसर काम करण्यासाठी शासन व स्थानिक ग्रामपंचायतींच्या परवानगीची व्यवस्था होऊन, या अवशेषांचे तत्काळ पंचनामे करून ते शासनाच्या किंवा संस्थेच्या ताब्यात ठेवणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांच्या लक्षात आणून दिले. गडकिल्ले भेटीत स्वच्छता मोहीम तसेच सर्वेक्षणानिमित्ताने मिळणाऱ्या वस्तू, मूर्ती, ठिकाणे यांचे जतन कायमस्वरूपी करावे लागणार असल्याने त्याकरिता दत्तक योजनेचा प्रस्ताव संस्थेचा आहे. त्यास रायगड जिल्हा परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.
जिल्ह्यातील किल्ले संवर्धनासाठी सरसावले गडप्रेमी
By admin | Published: March 13, 2016 3:42 AM