गडचिरोली - नक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश मिळाले असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईत 16 नक्षलवादी ठार झाले आहेत. गेल्या चार वर्षातील नक्षलवाद्यांविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले आहे. त्याआधी तीन एप्रिलला पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता.
नक्षल विरोधी अभियानाच्या जवानांवर गोळीबार करणा-या नक्षल्यांना जशास तसे उत्तर देत सुरक्षा दलाने १४ नक्षलवाद्यांना ठार मारले. सकाळी ९.३० ला सुरू झालेली दुपारी २ वाजेपर्यंत सुरूच होती. नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नेहमीप्रमाणे आज सकाळी ९.३० च्या सुमारास नक्षल विरोधी अभियानातील जवान गस्त करीत होते. अचानक त्यांच्यावर नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. या भागात नक्षलवादी दडून असल्याची आधीच माहिती मिळाल्यामुळे सुरक्षा दलाचे जवान सज्ज होते. त्यामुळे नक्षल्यांनी गोळीबार करताच जवानांनीही आक्रमकपणे त्यांना प्रत्युत्तर दिले. परिणामी सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू झाली. सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत 14 नक्षलवादी ठार झाल्याने अन्य नक्षलवादी बॅकफूटवर गेले. त्यांनी बचावाचा पवित्रा घेतला. जखमी तसेच मृत नक्षलवाद्यांना ओढत नेत नक्षलवादी मागे सरत होते. दुसरीकडे पोलिसांनी त्यांचा मुकाबला केल्यानंतर दुपारी २ वाजतानंतर नक्षल्यांनी घनदाट जंगलाकडे पळ काढणे सुरू केले. तशातही त्यांचा पोलिसांवर गोळीबार सुरू ठेवला.
चकमकीनंतर त्या परिसरात शोध घेतला असता 16 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईत नक्षल्यांच्या काही बंदुका व इतर साहित्यही पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. या कारवाईची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हेलिकॉप्टरने भामरागडकडे रवाना झाले. सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले जाणार आहेत.आजपर्यंतच्या नक्षलविरोधी अभियानातील हे पोलिसांचे सर्वात मोठे यश आहे. गेल्यावर्षी वेगवेगळ्या पोलीस-नक्षल चकमकीत 19 जण ठार झाले होते. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार माहिन्यातच 21 जणांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असल्याचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.