संजय तिपाले, गडचिरोली Maharashtra Vidhan Sabha 2024: महायुतीच्या बालेकिल्ल्याला निवडणुकीआधीच बंडखोरांनी हादरा दिला, तर महाविकास आघाडीची वाटही बंडखोरांनी अवघड केली. अशा परिस्थितीत महायुती गड राखणार की महाविकास आघाडी चमत्कार करणार, हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आरमोरी, गडचिरोलीत सध्या भाजपचे वर्चस्व आहे, तर अहेरीचा रिमोट राष्ट्रवादीकडे (अजित पवार गट) आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दहा वर्षांच्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यामुळे तिन्ही मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही उमेदवार बदलाची खेळी काँग्रेसने केली आहे. भाजपने 'लाडकी बहीण'सह इतर योजनांचा प्रचार जोमात सुरु केला असून काँग्रेसने स्थानिक मुद्द्यांना ढाल बनवित लढाई सुरु केली आहे. बंडखोर कोणाचे गणित बिघडवितात, मतदार कोणाला साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.
दोन ठिकाणी थेट, अहेरीत चौरंगी लढत अहेरी
आरमोरी व गडचिरोलीत महायुती व महाविकास आघाडीत थेट लढत आहे; पण अहेरीत चौरंगी लढत होत आहे. तेथे महायुतीत भाजपच्या तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या शिलेदाराने बंडखोरी केली आहे. राजपरिवारातील तिघांमुळे अहेरीतील लढाई अधिक चुरशीची आहे.
कृष्णा गजबे हॅट्ट्रिक करतील का?
काँग्रेसने आरमोरी व गडचिरोलीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तर भाजपने गडचिरोलीत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना बाजूला सारून नवा पैलवान मैदानात उतरविला आहे. यात कोण सरस ठरणार याची उत्सुकता आहे. आरमोरीत महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे हॅट्ट्रिक करणार काय, याकडेही नजरा खिळल्या आहेत.
राजपरिवाराच्या संघर्षात कोण मारणार बाजी?
एक अपवाद अहेरीवर वगळता पाच दशकांपासून आत्राम राजपरिवाराची हुकूमत आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाने त्यांची कन्या भाग्यश्री यांना मैदानात उतरविले आहे. सोबतच महायुतीत बंडखोरी करून धर्मरावबाबांचे पुतणे अम्ब्रीशराव अपक्ष लढत आहेत. काँग्रेसच्या हनमंतू मडावी यांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. दिग्गज नेते धर्मरावबाबांची शत्रुपक्षासह मित्रपक्ष भाजपने कोंडी केली आहे. हा चक्रव्यूह ते भेदणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
निवडणुकीत महत्त्वाचे फॅक्टर
बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव, दळणवळणाच्या अडचणी, दुर्गम, अतिदुर्गम भागांत नागरिकांचे होणारे हाल हे प्रश्न ऐरणीवर आहेत. बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, पण सिंचनाच्या • सुविधा पुरेशा नाहीत. कोटगल, हल्दी-पुराणी, चेन्ना, कोसरी, कुडकुली, आदी प्रकल्पांचे काम रखडलेले आहे. वनउपजावर आधारित लघुउद्योग नाहीत. कच्चा माल परराज्यांत जातो. मोह, बांबूला उत्तम बाजारपेठ हवी. पर्यटनविकासाचाही बॅकलॉग आहे.