ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ११ - सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी लगबगीने निघालेले पुरूष व महिला कर्मचारी अशा स्थितीतीच शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असताना गडचिरोली शहराचा मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात बेवारस स्थितीत सुटकेस असल्याची माहिती मिळाली. तत्काळ पोलीस विभागाची सारी यंत्रणा जागरूक होऊन कामाला लागली. छत्तीसगडकडे जाणाºया धानोरा मार्गावरची वाहतूक ठप्प करण्यात आली. चामोर्शी, नागपूर, चंद्रपूर मार्गावर तत्काळ सामान्य नागरिकांना बाजूला करीत वाहतूक बंद करण्यात आली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हा सर्व कार्यक्रम चालला. त्यानंतर पोलीस विभागाचे स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब विरोधी शोध, श्वॉन पथक घटनास्थळी आणण्यात आले. बॉम्ब शोधपथकाचे शेकडो कर्मचारी या कामी लागलेत. नंतर क्रेनसारखी एक पोलिसांचीच गाडी आणून दोन बाजुला दोर लावून ही सुटकेस अलगद उचलण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण उपस्थितांच्या छातीचे ठोके धडधडत होते. गडचिरोलीत बॉम्ब आढळला, बॉम्ब कुणी ठेवला असेल, याच्या चर्चा सुरू झाल्या. अनेक तरूण या गर्दीतही सुटकेसपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत होते. अखेरीस पोलिसांच्या यंत्रणेने ही सुटकेस उचलून अलगद पोलीस मुख्यालयाकडे नेली. त्यानंतर काही वेळाने हा सर्व प्रकार कदाचित स्वातंत्र्य दिन समोर असल्यामुळे पोलिसांच्या मार्क ड्रीलचा प्रकार असावा, अशी चर्चा पसरली. मात्र या संदर्भात गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना विचारणा केली असता, मार्कड्रील नव्हती. संशयास्पद स्थितीत बेवारस सुटकेस आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर ती पोलिसांनी ताब्यात घेतली, अशी माहिती त्यांनी दिली.