- इरफान शेख, कुर्डूवाडी (सोलापूर)रोजच्या जगण्यात प्रकाश माहीत नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना, दिवाळीच्या तेजोमय पर्वात नव्या कपड्यांसह फराळाची मेजवानी सोलापूर जिल्ह्यातील वडशिंगे येथील इसहाकभाई शेख यांच्या कुटुंबाकडून दिली जात आहे़ गेल्या पाच वर्षांपासून हे कुटुंब आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करत आहे़ यंदा सुमारे सहा हजार कुटुंबांसाठी एक ट्रकभर फराळ (३० क्विंटल) जाणार आहे.हा फराळ गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड व सिरोंचा तालुक्यातील २५ गावांतील कुटुंबांना वाटण्यात येणार आहे.पाच वर्षांपूर्वी एका बातमीत आदिवासींच्या हलाखीच्या जगण्याचे वृत्त वाचून इसहाकभाई शेख यांच्या संवेदनशील मनाला चटका बसला़ आपण त्यांच्या जीवनात नसलो, तरी दिवाळीत तरी त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणावेत, असे त्यांनी ठरविले़ कुर्डूवाडी-बार्शी रस्त्यावरील चिंचगाव टेकडी येथील सत्संग आश्रमाचे प. पू. रामानंद सरस्वती महाराज यांनी इसहाकभार्इंच्या या कल्पनेला प्रोत्साहित केले़ इसहाकभाई यांनी रामसिद्ध बहुद्देशीय समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी अलापल्ली तालुक्यातील गावामध्ये दिवाळीचा फराळ पाठविला. यंदा भामरागड व सिरोंचा तालुक्यात फराळाचे वाटप केले जाणार आहे़ फराळ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ९ तारखेला सकाळी ७ वाजता खाऊ व कपडे नेण्यात येणार आहेत.कोण आहेत इसहाकभाईइसहाकभाई शेख हे वडशिंगे येथील अल्पभूधारक शेतकरी असून, दुधाचा जोडव्यवसाय करतात़ आई, पत्नीसह दोन मुले आणि एक कन्या असे त्यांचे कुटुंब आहे़ फराळाच्या ट्रकसह ते स्वत: दोन्ही मुलांसह आदिवासी गावात जातात़ खर्चाचा मेळ बसविण्यासाठी माढा आणि परिसरातील दानशूर व्यक्तींकडून मिळेल त्या स्वरूपात मदत घेतात़ गडचिरोली जिल्ह्यासह अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात त्यांनी फराळाचे वाटप केले आहे़
ट्रकभर फराळ निघाला गडचिरोलीला
By admin | Published: November 08, 2015 12:24 AM