कुणीही जिंकलं तरी आमदारकी घरात राहण्यासाठी बाप-लेकीचा प्लॅन; पुतण्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:33 PM2024-09-14T12:33:44+5:302024-09-14T12:34:17+5:30
गडचिरोलीतील अहेरी विधानसभेत कायम आत्राम कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यात भाऊ-भाऊ त्यानंतर काका पुतणे लढाई झाली आता वडील आणि लेक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे.
गडचिरोली - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्यात. यात गडचिरोलीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरातच फूट पडल्याचं समोर आलं आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी बाप-लेकीचा सामना होणार आहे. परंतु कुणीही जिंकलं तरी आमदारकी घरीच राहणार असा प्लॅन या दोघांनी केल्याचा आरोप पुतण्या अंबरिशराव आत्राम यांनी केला आहे.
याबाबत अंबरिशराव आत्राम म्हणाले की, मी भाजपा सोडणार की नाही हा विषय नाही. एकदा तिकीटीची घोषणा होऊ द्या. सध्या जे काही सुरू आहे ते सगळे नाटक आहे. ५ वर्ष एकत्र राहून जावई, मुलगी आणि ते सर्वकाही केले. सगळं तेच करत होते. विधानसभेला मीच आमदार असं त्यांना वाटतं. सत्ता आणि पैशाची नशा या लोकांना आहे दुसरं काही दिसत नाही. त्यातूनच तुम्ही तिकडे जा, मी इकडे राहते. कुणीही जिंकलं तरी सत्ता घरी राहते हा त्यांचा प्लॅन आहे असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय शेवटी ते दोघं बाप-लेक आहेत काय करतील कुणालाच माहिती नाही. या लोकांवर मतदारसंघात कुणी विश्वास ठेवत नाही. सध्या यंदाची निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक लोकच करतील असा टोलाही अंबरिशराव आत्राम यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना लगावला.
भाग्यश्री आत्रामांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
जनतेचे प्रश्न विचारले तर माझ्यावरच आरोप केले, मला मतदासंघांत फिरवले अन् ऐनवेळी स्वतः लढण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या टीकेने खूप दुःख झाले, पण त्यांची टीका आशीर्वाद म्हणून घेईल असे भावोद्गार काढून तुम्ही शेर तर मी तुमची लेक शेरणी आहे आणि शेरणी अधिक आक्रमक असते असा इशारा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांना दिला. अहेरीत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्राम यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील लोकांशी संवाद साधला. भाग्यश्री ताई आत्रम आणि त्यांचे सर्व समर्थक पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सहभागी झाले, त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. भाग्यश्री ताई, तुम्हाला तुमच्या वडिलांनी जरी अंतर दिले असले तरी… pic.twitter.com/7bmClpIDK2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 12, 2024